Maharashtra Politics: विधान परिषदेच्या निवडणुकांकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे बाजी मारणार की, महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील गुलाल उधळणार, याची उत्सुकता राज्यातील जनतेला लागून राहिली आहे. यातच सत्यजित तांबे यांना भाजपने अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याची चर्चा सुरू आहे. सत्यजित तांबे यांचे विजय निश्चित आहे, त्यांनी भाजपमध्ये यावे, अशी खुली ऑफर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे.
डॉ. सुधीर तांबे आणि त्यांचे पुत्र उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या भूमिकेमुळे या मतदारसंघातील निवडणूक पहिल्या दिवसापासून गाजत आहे. या मतदारसंघात भाजपने आपला उमेदवार दिला नाही. तसेच भाजप नेतृत्वाने शेवटच्या दिवसापर्यंत सत्यजित तांबेंना जाहीर पाठिंबा दिला नव्हता. अखेर प्रचार संपल्याच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची भावना असल्याचे सांगत विखे यांच्या कार्यकर्त्यांना तांबे यांचे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
त्यांनी त्यांच्या पक्षालाच मामा बनविले असल्याचे दिसून येते
तांबे यांच्या मामांची म्हणजेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची वैयक्तिक काय भूमिका आहे, हे मला माहिती नाही. मात्र, त्यांनी त्यांच्या पक्षालाच मामा बनविले असल्याचे दिसून येते. सत्यजित तरुण आहे. त्याला आम्ही पाठिंबा दिला आहे. तो नक्की निवडून येईल. आता त्याने भाजपमध्ये यावे. यासाठी आम्ही अग्रही आहोत, असे विखे-पाटील म्हणाले.
दरम्यान, मतदान केंद्रावरही भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते सक्रीय झाल्याचे दिसून येते. सर्व ठिकाणच्या बुथवर पक्षाचे कार्यकर्ते थांबले आहेत. आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह भाजपच्या नेत्यांनीही केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. महविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही कंबर कसली. शुभांगी पाटील यांच्यासाठी त्यांनीही केंद्रावर बूथ लावले. भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही ठिकठिकाणी मतदान केंद्राला भेटी दिल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"