Radhakrishna Vikhe Patil On Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलनाला वेगवेगळी वळणे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सडकून टीका केली. या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. यानंतर, मराठा आंदोलनातील हिंसक वक्तव्ये आणि हिंसक कृती यांची सखोल चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) करण्याचे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत दिले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरून आता भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांना आदराचे स्थान दिले होते. आता मी म्हणजे मराठा समाज हे मनोज जरांगे यांनी डोक्यातून काढून टाकले पाहिजे. मराठा समाजाच्या भावनांशी खेळणे बंद केले पाहिजे. मनोज जरांगे यांनी आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेले बेताल विधान कोणत्याही शिष्टाचाराला धरून नाही. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी आरक्षण देण्याचे मान्य केले आहे. तसे जीआर काढले. आता तुम्हाला मान्य नाही, म्हणजे समाजाला मान्य नाही, असे होत नाही. तुम्ही म्हणजे समाज नाही, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
प्रसंगी समाजाच्या जागृतीचे काम घ्यायला मी तयार आहे
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून तुम्हाला समाजाने पाठिंबा दिला. मात्र, आता तुमचे खरे रुप समोर येत आहे. समाजाच्या आडून तुम्हाला तुमचे इप्सित साध्य करायचे आहे. मात्र, मराठा समाज एवढा भोळा नाही. तुमच्या कोणत्याही भूमिकेला समाज बळी पडणार नाही. प्रसंगी समाजाच्या जागृतीचे काम घ्यायला मी तयार आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मनोज जरांगे कोणाची स्क्रिप्ट वाचतात, हे समोर येऊ लागले आहे. दगडफेकीची घटना झाली. ती दुर्दैवीच आहे. मात्र, त्यानंतर लगेचच जाणता राजा तिथे जातात. लगेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते जातात. उद्धव ठाकरे जातात. हे कशाचे द्योतक आहे. हे पूर्णपणे नियोजित आणि प्लानिंगने करण्यात आले होते, हे समोर येऊ लागले आहे. तुम्ही त्यात नसाल तर घाबरण्याचे कारण नाही. एसआयटी अशासाठी नेमलेली आहे की, यांच्या स्क्रिप्ट कोण लिहिते, यांचे मोबाइल रेकोर्ड तपासावे लागतील. यामागे कोणी षडयंत्र रचले आहे. त्या रात्री मनोज जरांगे यांच्या घरी कोण गेले होते. त्यांना उपोषणाला आणून कोणी बसवले, ही सगळी चौकशी व्हायला पाहिजे. दूध का दूध-पानी का पानी व्हायला हवे, ही शासनाची भूमिका आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.