मुंबई - एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. शिवसेना नेते आणि खासदार तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सद्य राजकीय घडामोडींवर सडेतोड पण भाष्य केले. यानंतर आता भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे.
"मुख्यमंत्र्यांचा निकाल लावला आता पक्षाचाही लावतील" असं म्हणत विखे पाटील यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. तसेच "शिंदे गट आणि भाजपावर आरोप-प्रत्यारोप करणारे संजय राऊत हे टीकेचे धनी होत आहेत. असं असलं तरी ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. गेल्या काही दिवसांपासून बंडखोर आमदारांवर आणि केंद्रीय तपास यंत्रणेवर त्यांनी वेगवेगळे आरोप केले आहेत. मात्र, त्यांच्या अशा विधानाने पक्ष प्रमुखांवर ही वेळ आली तर आता ते पक्षाचाही निकाल लावत आहेत" असं राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबत असल्याने विरोधकांकडून सरकारवर टीका होत असली तरी ही टीका विकासकामांसाठी नाहीतर हे सत्ता गेल्यानं आलेलं वैफल्य असल्याचं देखील विखे-पाटील यांनी सांगितलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीनंतर शिवसेनेतील बंडखोर गट आणि भाजपाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
"ठाकरे कुटुंब पैसे देऊन गर्दी गोळा करतं"; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
"ठाकरे कुटुंब पैसे देऊन गर्दी गोळा करतं" असा गंभीर आरोप निलेश राणे (BJP Nilesh N Rane) यांनी केला आहे. तसेच "उद्धव ठाकरेंनी (Shivsena Uddhav Thackeray) फुटलेला पेपर सोडवला. धनुष्यबाण हे चिन्ह आता उद्धव ठाकरेंना न शोभणारं आहे. गेलेल्या लोकांना गद्दार म्हणून तुम्ही योद्धा होत नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच राणेंनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे. "संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय" असं म्हटलं आहे.