पनवेल : ‘रामशेठ ठाकूर आता भाजपात आले आहेत. त्यांच्यामुळे रायगड जिल्ह्यात पक्षाला चांगली ताकद मिळणार असून काँग्रेसवाल्यांवर मात्र ‘हे राम’ म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पनवेल येथे केली. त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी माजी खासदार रामशेठ ठाकूर व प्रशांत ठाकूर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला.छत्रपती संभाजी महाराज मैदानावरच्या या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी जमली होती. ‘रायगडात आम्हाला म्हणावे तशे यश मिळाले नव्हते. मात्र रामशेठ व प्रशांत ठाकूर यांच्यामुळे पक्ष संघटनेला बळकटी येणार आहे,’ असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. टोल नाक्याच्या मुद्यावर लक्ष वेधत ते म्हणाले की, ‘या टोलचा जन्मदाता मीच आहे आणि हा प्रश्नही मार्गी लावेन. त्यामुळे ज्या कारणाने तुम्ही काँग्रेसला राम राम ठोकला तो सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’, अशी ग्वाही नितिन गडकरी यांनी ठाकूर यांना दिली. ‘पृथ्वीराज चव्हाण यांच्यापेक्षा विलासराव देशमुख लाख पटींनी चांगले होते,’ अशी टीका त्यांनी केली. ‘टोल नाक्याच्या मुद्यावर राजीनामा देणारा माणूस भाजपात आला आहे,’ असे विनोद तावडे यांनी सांगितले. ‘रामशेठ यांच्यामुळे भाजपाचे सरकार पडले असे म्हणतात. त्यांना पक्षाने व्हिप बजावला होता. त्यामुळे ठाकूर यांनी त्यांचे काम प्रामाणिकपणे केले. यामुळे त्यांच्यावर टीका करण्याचा प्रश्न येत नाही,’ असे स्पष्टीकरण तावडे यांनी दिले. ‘रामशेठ तेव्हा भाजपात असते तर सरकार वाचले असते मात्र आता ते पक्षात आलेत, त्यामुळे राज्यात आपले सरकार येईल,’ असा आशावाद मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
रायगडमध्ये भाजपाला बळकटी!
By admin | Published: September 24, 2014 4:44 AM