लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने भाजपसोबत युतीमध्ये किमान २२ जागा मागण्याची भूमिका घेतल्याने भाजपच्या भुवया उंचावल्या आहेत. इतक्या जागा शिंदे गटाला कशा द्यायच्या, अशी कुजबुज भाजपच्या प्रदेश कार्यालयात शुक्रवारी ऐकायला आली. त्यामुळे महाविकास आघाडीप्रमाणेच भाजप-शिंदे सेनेतही जागा वाटपावरून खटके उडणार, अशी चिन्हे आहेत.
२०१९ मध्ये भाजप-शिवसेना युतीला राज्यात तब्बल ४१ जागांवर विजय मिळाला होता. शिवसेनेचे १८ खासदार निवडून गेले होते; मात्र आज त्यातील १३ खासदार शिंदे यांच्याकडे, तर ५ खासदार उद्धव ठाकरेंसोबत आहेत. अविभाजित शिवसेनेने जिंकलेल्या १८ जागा आम्हीच लढविणार, अशी भूमिका ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली होती. आता शिंदे गटाने त्याही पुढे जात २२ जागा मागितल्याने भाजपने सावध पवित्रा घेतला आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिंदे यांच्यासोबतच्या युतीत लोकसभेच्या आणखी काही जागा आपल्याला मागून घेता येतील, या भाजपच्या महत्त्वाकांक्षेला धक्का बसल्याचे मानले जाते. शिंदे गटाला लोकसभेच्या १४ ते १६ जागा द्याव्यात आणि आपण ३२ ते ३४ जागा लढवाव्यात, असा भाजपमध्ये सूर आहे. शिंदे गटाशी चर्चा करताना कोणता युक्तिवाद करायचा, याची पूर्वतयारी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी करून ठेवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
...तर शिंदे गटाच्या हाती ‘कमळ’ शिंदे गटाचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत ‘कमळ’ या भाजपच्या चिन्हावर लढतील, अशी शक्यता सुरुवातीला व्यक्त केली जात होती; मात्र आता शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ हे मूळ चिन्ह मिळाले आहे; परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी कायदेशीर लढाईत शिंदे गटाकडून चिन्ह गेले तर हाती ‘कमळ’ घेण्याचा विचार होऊ शकतो.
भाजपची रणनीती काय? गेले जवळपास एक वर्ष भाजपकडून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये सातत्याने निवडणूक सर्वेक्षण करणे सुरू आहे. या सर्वेक्षणात समोर आलेल्या उणिवांवर लगेच उपाययोजना केल्या जात आहेत.
शिंदे गटाच्या सध्याच्या १३ खासदारांबाबत; तसेच गेल्यावेळी शिवसेनेने जिंकलेल्या अन्य पाच जागांबाबत सर्वेक्षणांमधून आलेल्या निष्कर्षांची माहिती भाजपकडून शिंदे गटाला प्रत्यक्ष जागा वाटपाच्या चर्चेवेळी दिली जाईल, अशी माहिती आहे. भाजपचा प्रभाव असलेल्या मतदारसंघांमध्ये निवडून आलेल्या शिवसेनेच्या जागांवर भाजपची नजर असेल, असे मानले जाते.