बोलता येतेय, तोवर चर्चेसाठी या! आरक्षण द्यायचं की नाही ते सांगा, असा निर्वाणीचा इशारा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. अशातच भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले त्यांची भेट घेण्यासाठी निघाले होते. परंतू, ते वाटेतूनच पुन्हा माघारी परतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
उदयनराजे पुण्यात थांबले आहेत. ते जालन्यातील आंतरवाली सराटी येथे जायला निघाले होते. राज्य सरकारची आरक्षण उपसमितीसोबत आज बैठक होती. या बैठकीत आरक्षण देण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे वाटले होते. परंतू, तसे काहीही झालेले नाहीय. जरांगे पाटील यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे, पण सरकारकडून कोणताही निर्णय झालेला नाही. मनोज जरांगे पाटील यांची पहिल्यांदा केलेल्या उपोषणात उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली होती. यामुळे या वेळीही उदयनराजे भेटायला जात होते. परंतू, ते पुण्यातच का थांबले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. एबीपी माझाने याचे वृत्त दिले आहे.
आज सकाळी दोनदा वैद्यकीय पथक तपासणी व उपचार देण्यासाठी दाखल झाले. पथकाने विनंती केली असता, तुम्ही खाली व्हा असं म्हणत जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेतून जरांगे यांनी स्वतःची काळजी घेत उपचार घेण्याचे आवाहन केले. तसेच नवीन पुरावे पुढे येत आहेत, शिंदे समितीला आणखी वेळ लागणार आहे. सरकारला आणखी वेळ देण्यात यावा असेही शिंदे म्हणाले.