शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरू झाली असून पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही मुंबईतच दसरा मेळावा घेण्यासाठी कंबर कसली आहे. याच दरम्यान आता भाजपाने शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.
"दसरा मेळाव्यासाठी मैदान भरावे म्हणून पेंग्विन सेनेने मागितली काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. "दसरा मेळावा, काय सत्य... महाराष्ट्राला सांगतील का पेंग्विन सेनेचे नेते?" असा खोचक सवालही भाजपाने विचारला आहे. भाजपाचे नेते राम कदम (BJP Ram Kadam) यांनी शिवसेनेचा पेंग्विन सेना असा उल्लेख करत निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
"महत्वपूर्ण... दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कचे मैदान भरावे म्हणून पेंग्विन सेनेने मागितली राष्ट्रवादी तथा काँग्रेसकडे मदत... आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भरणार शिवाजीपार्क मैदान... काय सत्य? महाराष्ट्राला सांगतील का पेंग्विन सेनेचे नेते" असं राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ; शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर रिलीज
"एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ" असं म्हणत शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा दमदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात शिवसैनिकांना आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा, हिंदवी तोफ पुन्हा ध़डाडणार असं म्हणत बी. के. सी मैदानात सायंकाळी पाच वाजता हा दसरा मेळावा होणार असल्याचं टीझरमध्ये म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठीवेबसाईट "लोकमत डॉट कॉम"