महाविकास आघाडीचा शिंदे-फडणवीस सरकारला टार्गेट करणारा हल्लाबोल मोर्चा एकीकडे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्त्युत्तर देण्यासाठी भाजपकडून माफी मांगो आंदोलन करण्यात येत आहे. हल्लाबोल मोर्चातून महाविकास आघाडी शक्तिप्रदर्शन करत आहे. महापुरुषांचा अवमान, सीमाप्रश्न, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांसाठी हा मोर्चा निघाला असून पोलिसांनी काही अटी शर्थींसह परवानगी दिली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मुंबईभर ‘माफी मांगो’ आंदोलन करत आहेत. याच दरम्यान भाजपाने खोचक टोला लगावला आहे.
"नागपूरला भाड्याची·का होईना गर्दी जमणार नाही म्हणून की काय नागपूर सोडून मुंबईला मोर्चा?" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "स्वर्गीय बाळासाहेबांना काय वाटत असेल... ज्यांनी संपूर्ण हयात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दुश्मनी केली... अन् आज त्यांचे नातू आणि पूत्र त्याच काँग्रेसच्या पाठीमागे फरफटत चाललेत..." असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते राम कदम (BJP Ram Kadam) यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
राम कदम यांनी "सोमवारपासून नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे... आजपर्यंत कधीही विरोधी पक्ष असो वा अन्य कोणीही संघटना... जिथे अधिवेशन तिथेच मोर्चा काढतात... मात्र महाविकास आघाडी जी केवल महाराष्ट्रातल्या केवळ काही जिल्ह्यापूरती किरकोळ शिल्लक असल्यामुळे की काय... नागपूरला भाड्याची·का होईना गर्दी जमणार नाही म्हणून की काय नागपूर सोडून मुंबईला मोर्चा?" असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"असो... स्वर्गीय बाळासाहेबांना काय वाटत असेल... ज्यांनी संपूर्ण हयात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दुश्मनी केली... अन् आज त्यांचे नातू आणि पूत्र त्याच काँग्रेसच्या पाठीमागे फरफटत चाललेत...हे मात्र निश्चित स्वर्गातूनही बाळासाहेब... त्यांचे विचार पुढे नेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अन् त्यांच्या बहादूर शिलेदारांनाच आशीर्वाद देत आहेत..." असं देखील राम कदम यांनी म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"