मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Arrest) यांना तब्बल 13 तासांच्या दीर्घ चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले अनिल देशमुख सकाळी ईडीसमोर हजर झाले. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. याच दरम्यान आता भाजपाने (BJP) अनिल देशमुख यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
भाजपा आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी अनिल देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना?" असा सवाल कदम यांनी विचारला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर आता दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीमध्ये त्यांचे प्रमुख बॉस कोण आहेत? वसुलीचे हिस्सेदार, वाटेकरी, कोण कोण नेते आणि पक्ष आहेत, हे समोर येईल. अन अर्थातच त्या बड्या नेत्यांनाही जेलमध्ये जावे लागेलच" असं राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"महिन्याला एका खात्यात फक्त मुंबईतून 100 कोटी तर संपूर्ण महाराष्ट्रात किती?"
"ही लढाई कोणा एका व्यक्ति विशेषच्या विरोधातील नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. कल्पना करा. महिन्याला एका खात्यात फक्त मुंबईतून 100 कोटी तर संपूर्ण महाराष्ट्रात किती? अन सर्व खाती मोजली तर किती कोटी? हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना?" अशा शब्दात राम कदम यांनी टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान, सीबीआयने अनिल देशमुख यांच्या कार्यालय व घरावर पाचवेळा छापे टाकले. देशमुख यांनी आपल्यावरील कारवाई रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
13 तासांच्या चौकशीनंतर अखेर अनिल देशमुखांना ED कडून अटक
मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्यास मात्र मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. अनिल देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट देत होते. 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगायचे. मुंबईतील बार रेस्टॉरंटमधून वसुली करण्यास सांगायचे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून पोलिसांना बंगल्यावर बोलवायचे, असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केला होता.