“राहुल गांधींनी कॅट वॉक करायला आषाढी पालखी सोहळ्यात येऊ नये”; भाजप नेत्याची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 03:39 PM2024-07-05T15:39:39+5:302024-07-05T15:42:31+5:30
BJP Slams Rahul Gandhi: आजपर्यंत राहुल गांधींना कधी विठ्ठल अथवा पालखी आठवली नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा घेण्यासाठी वारीत येत आहेत, अशी टीका भाजपाने केली आहे.
BJP Slams Rahul Gandhi: १७ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. राज्यभरातून संतांच्या पालख्या पंढरपुराकडे मार्गस्थ झाल्या आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार आणि शिस्तबद्धतीने पालख्या मार्गक्रमण करत आहेत. पंढरपुरातील विठुरायाला भेटण्याची ओढ वारकऱ्यांना लागली आहे. राज्यात एकीकडे वारीचा उत्साह असून, दुसरीकडे राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. यातच राहुल गांधी वारीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून भाजपाच्या माजी खासदारांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून नेते, पदाधिरी वारीत सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा डोळ्यासमोर असल्याने शरद पवार हे वारीत सहभागी होणार असल्याचे वृत्त असून, अशातच राहुल गांधी हेही वारीत सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राहुल गांधी आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रयत्न करत असल्याची माहिती देण्यात येत आहे. भाजपाचे माजी खासदार रणजीत निंबाळकर यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
राजकीय फायदा घेण्यासाठी वारीत सहभाग
पंतप्रधान मोदी आणि राज्य सरकारने कोट्यवधीचा निधी वारकरी संप्रदायाला दिला आहे. पालखी मार्ग केले तरी याचा राजकीय वापर केला नाही. राहुल गांधी यांनी आषाढी पालखी सोहळ्यात कॅट वॉक करायला येऊ नये. कोणत्याही राजकीय पक्षाने या भोळ्या भाबड्या वारकरी संप्रदायाचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करू नये. आजपर्यंत राहुल गांधी यांना कधी विठ्ठल अथवा पालखी आठवली नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा घेण्यासाठी येण्याच्या चर्चा सुरू केल्या आहेत, त्याचा निषेध आम्ही करतो, अशी टीका निंबाळकर यांनी केली.
दरम्यान, महाराष्ट्रातील सर्वांत मोठा उत्सव असणाऱ्या आषाढी सोहळ्यासाठी लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे १३ किंवा १४ जुलै रोजी पंढरपुरात येऊन विठुरायाचे दर्शन घेणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यापूर्वी पालखी सोहळ्यासोबत चालण्याचा आनंदही त्यांना घ्यायचा असून याबाबत प्रयत्न करण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती देण्यात येत आहे.