ठाणे: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी आपल्या भाषणादरम्यान मोठी गल्लत केली. ते मंगळवारी पालघर येथील जाहीर सभेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी खासदार चिंतामण वनगा यांच्याऐवजी स्थानिक आमदार विष्णू सावरा यांचे निधन झाल्याचा उल्लेख केला. विशेष म्हणजे बराचवेळ दानवे यांना आपली चूक लक्षात आली नाही. त्यांनी आपले भाषण पुढे तसेच सुरू ठेवले. त्यानंतर पुन्हा एकदा दानवेंनी सावरा कुटुंबीय तिकडे गेले म्हणून भाजपाचे नुकसान होणार नाही, असे म्हटले. मात्र, यावेळी त्यांना आपली चूक लक्षात आली. त्यानंतर दानवेंनी व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तींकडे बघून काहीतरी थातूरमातूर स्पष्टीकरण दिले. मात्र, एव्हाना हा सारा प्रकार उपस्थित लोक आणि प्रसारमाध्यमांच्या लक्षात आला. त्यामुळे रावसाहबे दानवे आणि भाजपाची चांगलीच शोभा झाली. गेल्याच आठवड्यात दिवंगत चिंतामण वनगा यांच्या कुटुंबाने आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर सोमवारी शिवसेनेकडून त्यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारीही देण्यात आली. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी वनगा कुटुंबीय भाजपाचे नुकसान करणार नाहीत, असे म्हटले होते. परंतु एकंदरच भाजपाच्या नेत्यांना वनगा कुटुंबाविषयी असलेली आपुलकी आज रावसाहेब दानवे यांच्या विधानाच्यानिमित्ताने दिसून आली.
गलतीसे मिस्टेक; रावसाहेब दानवेंनी वनगांऐवजी विष्णू सावरांना केले 'स्वर्गवासी'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2018 3:24 PM