Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच आता खासदार डॉ. अमोल कोल्हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या प्रकरणावर भाजपने प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.
अमोल कोल्हे मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या काही कार्यक्रमांना गैरहजर राहत आहेत. त्यामुळे ते राष्ट्ववादीवर नाराज आहेत, अशा चर्चा आहेत. तसेच काही दिवसांआधी केंद्रीय रावसाहेब दानवे आणि अमोल कोल्हे यांची जालन्यात भेट झाली. रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्या कन्स्ट्रक्शन कार्यालयाचे अमोल कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात झाले. विशेष म्हणजे या उद्घाटनानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दानवे यांच्या गाडीत तबल २५ मिनिटे गुप्त चर्चा झाल्याची माहिती आहे. यानंतर आता भाजपने अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले असून, अमोल कोल्हे यांच्या नाराजीवरून त्यावर भाष्य करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बडा घर पोकळ वासा!
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बडा घर पोकळ वासा! शरद पवारांच्या बैठकीला अमोल कोल्हे गैरहजर! पक्षांतर्गत गटबाजी आणि संघर्ष यामुळे शरद पवार यांच्या पक्षाचा आता पुण्यात निभाव लागणं निव्वळ अशक्य!, असे ट्विट भाजपकडून करण्यात आले आहे. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्या नाराजीवर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली होती.
काय म्हणाले होते दिलीप वळसे-पाटील?
दिलीप वळसे पाटील यांनी कोल्हे यांच्या कथित नाराजीवर भाष्य केले आहे. मूळात राज्यामधील अपयश पचवण्यासाठी भाजप नेते वेगवेगळ्या क्लुप्त्या काढत आहेत. अमोल कोल्हे नाराज नाहीत. त्यांच्या नाराजीचा प्रश्नच येत नाही. २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल, असा विश्वास दिलीप-वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"