ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 22 - आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी शहरात भाजपा व शिवसेना यांच्या जिल्हा बैठका पार पडल्या. त्यात भाजपाने या निवडणुकीत जेथे शक्य आहे तेथे युतीचे प्रस्ताव स्वीकारून सन्मानजनक तोडगा काढला जाईल, असे सुतोवाच करून शिवसेनेसोबत युतीसाठी राजी असल्याचे संकेत दिले. दुसऱ्या बाजूला मात्र शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, सहकार राज्यमंत्री यांनी भाजपावर शेलक्या शब्दात टिका करीत ही निवडणूक स्वबळावर लढविण्याचा नारा दिला. सेनेने आपल्या जिल्हा बैठकीत पाच जि.प. गटांसाठीचे उमेदवार जाहीर केले. त्यात पाचोरा तालुक्यातील चार तर रावेरातील एका गटाचा समावेश आहे. भाजपाची जिल्हा बैठक सरदार पटेल सभागृहात जलसंपदामंत्री गिरीश महाजन व इतर ज्येष्ठ, वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झाली. त्यात नननिर्वाचीत नगराध्यक्ष, नगरसेवकांचा सत्कार झाला. तसेच जि.प. निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आवाहन भाजपा नेत्यांनी केले. काही प्रमुख पदाधिकाऱ्यांवर जबाबदारीही सोपविण्यात आली.शिवसेनेची जिल्हा बैठक जि.प.उपाध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीतही नवनिर्वाचीत नगराध्यक्ष, नगरसेवकांचा सत्कार झाला. पदाधिकाऱ्यांसोबत नेत्यांनी स्वतंत्र वेळ देऊन नंतर चर्चाही केली. कुठे काय स्थिती असेल याची माहिती घेतली. जेथे कमी इच्छुक आहेत त्या जि.प. गटांची यादी सादर करण्यात आली.
भाजपाने नगरपालिका निवडणुकीतील यश पैशांच्या बळावर मिळविल्याची टिका मिर्लेकरांनी केली. तर भाजपावाले बोलताना गोड, चांगले बोलतात, पण निवडणुकीत करताना वेगळेच करतात. थोडे सांभाळून राहा, अशा शेलक्या शब्दात राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले.
या बैठकांच्या निमित्ताने सेना व भाजपाने जि.प., पं.स., निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या २३ रोजी दुपारी २ वाजता शहरातील पक्षाच्या कार्यालयात माजी आमदार, वरिष्ठ पदाधिकारी, तालुकाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. तसेच २३ पासून इच्छुकांना अर्ज विक्री केली जाणार असल्याचे पक्षाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.