कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाने आता स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी चालविली असून राज्यातील सर्वच २८८ मतदारसंघात संभाव्य उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात मंगळवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात अशा प्रकारे मुलाखती होणार आहेत.
भाजप आणि शिवसेना यांची युती होणार की नाही हे अद्याप स्पष्ट होत नसले तरी ऐनवेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात येऊन शकतो, त्यामुळे ऐनवेळी धावपळ होऊन नये तसेच गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या १२३ मतदारसंघ वगळता उर्वरित १६५ मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम चालू झाले आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याला एका वरिष्ठ नेत्याची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन सर्वच मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत.राज्याचे कामगारमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी आज सांगलीमध्ये मुक्काम ठोकून जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. तर जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सोलापूर येथे अकराही मतदारसंघातील इच्छुकांच्या भेटी घेऊन चाचपणी केली. अनेक मतदारसंघात भाजपकडे किमान ३ ते ४ उमेदवार इच्छुक आहेत.
कोल्हापूरला येत्या दोन दिवसांत पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे तर साताऱ्याला औरंगाबादचे आमदार अतुल सावे निरीक्षक म्हणून येणार आहेत. पुणे जिल्ह्यासाठी अद्याप निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. मात्र पुढील आठवड्यात पुणे जिल्ह्यात निरीक्षक येणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात भाजपला अपेक्षित उमेदवार मिळत नाही. यासाठी चाचपणी करण्यात येत असून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीतून येणाऱ्यांना उमेदवारी देण्यावर भर देण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक पाठवून संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
ठिकठिकाणी आलेल्या निरीक्षकांनी शिवसेनेबरोबर युती होणार आहे असे सांगतानाच, आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांची मते आजमावून घेण्यासाठी आणि संभाव्य उमेदवारांचा कल समजून घेण्यासाठी सर्वच मतदारसंघात आम्ही उमेदवारांच्या मुलाखती घेत आहोत, असेही स्पष्टीकरण दिले.
शिवसेनाही आक्रमक; उमेदवार आयातभाजपच्या आक्रमक ‘इनकमिंग’ला उत्तर देण्यासाठी शिवसेनाही आक्रमक झाली असून ज्या मतदारसंघात सक्षम उमेदवार नाहीत तेथे इतर पक्षांतून उमेदवारांना आयात करण्याचे धोरण स्विकारले आहे. या दोन्ही पक्षांकडून आतातरी स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचा निर्णय झाला तर तयारी असावी ऐनवेळेला गडबड होऊ नये, असे सध्याचे धोरण दिसते.