मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजप- शिवसनेने एकत्र निवडणूक लढवली असली तरीही, विधानसभेत भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे. शिवसेनेसोबत युती होणार नाही, हे गृहीत धरूनच प्रत्येकाने कामाला लागावे असे आदेश स्थानिक पातळीवर देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या पूर्वतयारीच्या बैठकीत स्थानिक कार्यकर्त्यांना अशा सूचना दिल्या जात आहे.
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा भाजप-शिवसेनेची युती होणार असे निश्चित समजले जात होते. मात्र आता भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढण्याच्या हालचाली सुरु झाल्या असल्याचे समोर आले आहे. शिवसेनेसोबत युती होणार नाही, हे गृहीत धरूनच प्रत्येकाने कामाला लागावे. अशा सूचना भुसावळ भाजपचे जिल्हा अध्यक्ष डॉ.संजीव पाटील यांनी जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. त्यामुळे भाजप युती न करता स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा भाजपच्या गटात पहायला मिळत आहे.
भारतीय जनता पक्ष शिवसेनेशी युती करून आगामी विधानसभा निवडणुका लढविण्याची भाषा करीत असला तरी निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जाण्याची तयारी करीत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील ५८ मतदारसंघांत सक्षम उमेदवार मिळविण्यासाठी त्यांनी जोरदार आखणी केली असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंतुष्टांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच स्थानिक नेत्यांना, युती होणार नाही हे गृहीत धरूनच कामाला लागा व वातावरण निर्मिती करा असे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपकडून ऐनवेळी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेतील आकडेवारी समोर आली आहे. त्यात भाजपला १६० तर सेनेला ९० जागा दाखविण्यात आल्या आहेत. सहाजिक या जागा बहुमतापेक्षा अधिक आहे. त्यामुळे भाजपला स्वबळावर लढणे फायद्याचे ठरणार आहे. अर्थात, युती केल्यास, भाजपच्या वाट्याला केवळ १४४ जागा येतील. त्यातही महायुतीतील घटक पक्षांना काही जागा सोडाव्या लागतील. सर्वच्या सर्व जागा निवडून आल्या तरी भाजपला बहुमत मिळणार नाही हे निश्चित आहे. त्यामुळे भाजप ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून एकटे लढण्याचा निर्णय घेऊ शकते, असे बोलले जात आहे.