मुंबई : सिडकोतील भूखंड घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी फेटाळून लावले. ज्या विषयाची फाइलच मुख्यमंत्र्यांपर्यंत येत नाही, त्यात अकारण मुख्यमंत्र्यांना गोवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण सापडत नसल्यामुळे हताश झालेल्या काँग्रेसने पोरकटपणाचे प्रदर्शन केले आहे, असे प्रत्युत्तर भांडारी यांनी दिले.काँग्रेसने केलेल्या आरोपांवर सरकारकडून स्पष्टीकरण (पान ८ वर)अपेक्षित असताना भाजपा प्रवक्ते भांडारी यांनी पत्रपरिषद घेऊन खुलासा केला. ते म्हणाले, ती जमीन सिडकोच्या नव्हे तर शासनाच्या मालकीची आहे. सदर जमिनीचे बाजारमुल्य ५.२९ कोटी रुपये असताना काँग्रेसने त्याची किंमत १७६४ कोटी रुपये कुठून काढली? या जमीन प्रकल्पग्रस्तांना दिल्यानंतर त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र न्यायालयाने ती याचिका खारिज केली होती.मुळात २४ एकर जमीन कोयना धरण प्रकल्पग्रस्तांपैकी ९ जणांना वाटप करण्यात आली आहे. हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर होत असतो. त्यात मुख्यमंत्री वा मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध येत नाही. उलट, आघाडी सरकारच्या काळात २००९ मध्ये तातुजी कदम यांची तळोजा येथील जमीन क्वीन डेव्हलपर्सने विकत घेतली आहे. २२ फेब्रुवारी २०१४ रोजी जगन्नाथ कदम यांनी त्यांची जमीन रब्बानी खान बिल्डर्सला विकली आहे. २०१३ मध्ये मयूर नरसिंग कदम यांनी आपली जमीन अग्रवाल बिल्डर्सला विकली आहे. अगदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात सुद्धा दत्तात्रय कदम यांनी आपली जमीन क्वालिटी नमन बिल्डर्सला विकली असल्याचा दावा भांडारी यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोप भाजपाने फेटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 6:06 AM