तिकीट नाकारल्याने भाजपा निष्ठावंतांचा उदे्रक
By admin | Published: February 04, 2017 5:58 PM
निष्ठावंतांना तिकीट नाकारुन ऐनवेळी पक्षात आलेल्यांना तिकीट दिल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर उपोषण केले.
पुणे : भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या यादीत नाव असतानाही निष्ठावंतांना तिकीट नाकारुन ऐनवेळी पक्षात आलेल्यांना तिकीट दिल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर उपोषण केले. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास संतप्त कार्यकर्त्यांच्या एका गटाने पक्षकार्यालयाबाहेर असलेल्या पोस्टरवरील शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्या फोटोला काळे फासले़
प्रभागातील प्रमुख नेत्याला सोबत कोण हवे, हे विचारात घेऊन त्यांना तिकिटे देण्यात आली़ त्याचा परिणाम अनेक गटांना तिकीट नाकारण्यात झाला़ ऐनवेळी यादीतील नावे बदलण्यात आली़ त्याचा उद्रेक पक्षकार्यालयासमोर पहायला मिळाला़
डहाणूकर कॉलनी प्रभाग क्रमांक १२ मध्ये ज्योत्स्ना जगन्नाथ कुलकर्णी आणि अॅड़ वर्षा डहाळे यांचे नाव यादीमध्ये होते़ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्या गेल्या होत्या. मात्र, त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या कुलकर्णी आणि वर्षा डहाळे यांनी पक्षकार्यालयासमोर उपोषणाला बसल्या. त्यानंतर तिकीट नाकारल्या गेलेल्या अनेकांनी त्यांच्याबरोबर उपोषणाला सुरुवात केली़
आम्हाला तिकीट देणार म्हणून सांगितले होते़ मग आता पक्षकार्यालय फोडणाºयांना तिकिटे कशी दिली़, असा सवाल वर्षा डहाळे यांनी केला. डॉ़ अपर्णा गोसावी यांनी सांगितले, की आम्ही अनेक वर्षांपासून काम करीत आहोत़ प्रभाग क्रमांक १४ डेक्कन जिमखाना, मॉडेल कॉलनीमध्ये जुन्या २४ मधील सर्वांना पक्षाने उमेदवारी दिली आहे़ गोखलेनगर, वडारवाडी, मॉडेल कॉलनीमधील कोणालाही तिकीट दिले नाही़
डॉ़ राजेंद्र खेडेकर म्हणाले, प्रभाग क्रमांक ३१ मधून एकमेव स्थानिक असताना कुणबीचे प्रमाणपत्र घेऊन आलेल्याला उमेदवारी देण्यात आली आहे़ ओंकार कदम यांनी पैसे घेऊन तिकिटे दिल्याचा आरोप केला.
शुभदा विटकर, भाऊसाहेब मोरे, मनीष साळुंके, प्रियंका मेमजादे, अब्दुल रेहमान अशा अनेकांनी या उपोषणात सहभाग घेतला़ हे उपोषण सुरू असतानाच पक्षातील काही कार्यकर्त्यांचा एक गट सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास तेथे आला़ त्यांनी शहराध्यक्ष योगेश गोगावले व अन्य आमदारांचा निषेध करण्यास सुरुवात केली़ तेथे असलेल्यांनी त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला़ तरीही त्यांनी तेथे लावलेल्या पोस्टरमधील गोगावले यांच्या फोटोला काळे फासले़ त्यानंतर घोषणाबाजी करीत हा गट तेथून निघून गेला़ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक अजय तायडे यांनी प्रभाग क्रमांक १६ मधून अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे़