नागपूर : भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) यांची राज्यात युती आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीतही ही युती कायम होती. परंतु नागपुरात रिपाइं (आ)ला भाजपाने एकही जागा सोडली नसल्याने ही युती तोडण्याचा निर्णय रिपाइं (आ)च्या नागपुरातील पार्लमेंट्री बोर्डाच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. नागपुरात भाजपाची रिपाइं (आठवले) आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंच यांच्याशी युती आहे. १५ जागांचा प्रस्ताव रिपाइंतर्फे भाजपाला देण्यात आला होता. परंतु ऐन वेळेवर रिपाइंला केवळ एक जागा सोडण्यात आल्याचे भाजपाकडून जाहीर करण्यात आले. सोडण्यात आलेल्या जागेवर ज्या उमेदवाराचे नाव आले आहे, तो उमेदवारही रिपाइं (आ)चा नसून भाजपाचाच आहे. त्यामुळे रिपाइंला भाजपाने एकही जागा सोडलेली नाही. त्यामुळे रिपाइं (आ)च्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सोमवारी सीताबर्डी येथील रिपाइं(आ)च्या शहर कार्यालयात निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पार्लमेंट्री बोर्डाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते आर. एस. वानखेडे, प्रा. पवन गजभिये, राजन वाघमारे, हरीश जनोरकर, विनोद थुल, कांतिलाल पखिड्डे, भीमराव मेश्राम, सतीश तांबे आणि राजेश ढेंगरे उपस्थित होते. एकही जागा सुटली नसल्याने भाजपासोबत राहण्यात काही अर्थ नाही, असे या वेळी सर्वांचेच मत बनले. त्यामुळे नागपुरात भाजपासोबत युती तोडण्याचा बोर्डाने निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल पक्ष श्रेष्ठींनाही कळविण्यात आले आहे. रिपाइं (आ)तर्फे सात उमेदवारांनी उमेदवारीचे अर्ज दाखल केले आहेत. त्या उमेदवारांचा पूर्ण ताकदीने प्रचार करणे आणि भाजपाविरोधात प्रचार करण्याचा निर्णयसुद्धा या बैठकीत घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
भाजपा-रिपाइंचा काडीमोड
By admin | Published: February 07, 2017 1:29 AM