मुंबई - भाजपनेत्या पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी राज्यातील पक्ष नेतृत्वाविरुद्ध एल्गार पुकारले. त्यांच्या साथीला नाराज नेते प्रकाश मेहता देखील होते. मात्र तुमच्या दबावाला आम्ही बळी पडणार नसल्याचे दाखवून देत भाजपकडून मुंडे आणि खडसे यांना जशास तसे उत्तर देण्यात येत आहे.
खडसे यांनी आपल्या पराभवासाठी पक्षातूनच प्रयत्न झाल्याचा दावा केला होता. तर पंकजा मुंडे यांनी देखील खडसेंच्या दाव्याला पाठिंबा दर्शवित आपण राज्यभर फिरत असताना आपल्या नेतृत्वाकडून माझ्या विरोधकाला ताकद देण्याचे काम झाल्याचा दावा केला. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सभेत पंकजा यांनी भाजप नेतृत्वाविरुद्ध आपली नाराजी व्यक्त केली.
दुसरीकडे खडसे यांनी देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन टीका केली. त्यांच्यामुळे पक्षासाठी हयात घालवणारे नेते बाहेर जात आहे. पक्ष सोडून जाण्यास भाग पाडलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यावर भाजपकडून भूमिका घेण्यात आली आहे.
भाजपकडून विधानसभेला डावलण्यात आलेले माजी मंत्री चंद्रशेख बावनकुळे यांनीच पंकजा मुंडे यांच्या भूमिकेचा समाचार घेतला. ओबीसी समाज भाजपावर नाराज नाही. गेल्या अनेक वर्षांपासून नेते पक्षासाठी काम करतायेत. पक्षाने सगळ्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे पदं दिली आहेत. नेते कर्तृत्वाने मोठे होतात जातीने नाही असा टोला बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांच्यासह खडसे यांना लगावला आहे.
दुसरीकडे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी देखील पंकजा यांच्यावर कडाडून टीका केली. मागील पाच वर्षात कोणत्या समाजाच्या कार्यकर्त्यांना मोठं केलं असा सवाल त्यांनी केला. तसेच पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांनी पक्षात काही काम केलं नसून त्यांना त्यांचा मतदारसंघ सांभाळता आला नाही. त्यामुळे त्यांनी पक्षाला याचा दोष देऊ नये असा सल्ला काकडे यांनी दिला.