मुंबई – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात उद्धव ठाकरे जाहीर सभेत सातत्याने भाजपा आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करत आहेत. त्यावरून भाजपा-ठाकरे गट यांच्यातील शाब्दिक संघर्ष पेटला आहे. भाजपाकडून उद्धव ठाकरेंवर होणाऱ्या टीकेवरून आमदार भास्कर जाधवांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर बोचरी टीका केली. त्यानंतर आता भाजपानेही भास्कर जाधव यांच्यावर पलटवार केला आहे.
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत जाधवांवर निशाणा साधला. उपाध्ये म्हणाले की, तोंड उघडले की गटारगंगा ! भास्कर जाधव यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांनी तोंड उघडले की गटारगंगा वाहत असते, याचा अनुभव असल्यामुळे त्यांच्या जवळपास कोणी फिरकत नाही. त्यांच्या पक्षाचे नेते सुद्धा त्यांना दोन हात दूर ठेवतात असा टोला त्यांनी जाधवांना लगावला.
त्याचसोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पक्ष वाढीसाठी असलेला धुमधडाका पाहून 'मातोश्री' चे डोळे दिपले असणार आणि भुंकण्यासाठी भास्कररावांचा पट्टा काढला असणार आहे. तुम्ही भुंकत राहा, दुसरे प्रवक्ते थुंकत राहतील, तुमच्या असल्या शिव्याशापांमुळे आमचा पक्ष जिंकत राहील! काय करणार? गटाराचं तोंड तर धरू शकत नाही अशी खोचक प्रतिक्रिया केशव उपाध्ये यांनी दिली आहे.
काय म्हणाले होते भास्कर जाधव?
चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंवर काहीही खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. कधी घरकोंबडा म्हणतात, तर कधी आणखी काही म्हणतात. मी मागच्यावेळी त्यांना काय म्हणालो होतो आठवतं, वेस्ट इंडिजचा एक प्लेअर होता एम्ब्रॉज, ही व्यक्तिगत टीका असेल तर मग तुम्ही उद्धव ठाकरेंना घरकोंबडा म्हणता ही व्यक्तिगत टीका नाही? शेवटी वेस्ट इंडिजच्या माणसाला ठाकरे घराण्याची महती काय कळणार? तुम्हाला वेस्ट इंडिजचे बोलणे लागते, परंतु तुम्हाला काय बोलायचे नाही, देवेंद्र फडणवीसांना काय बोलायचे नाही. मग आमच्या पक्षप्रमुखांना तुम्ही वाटेल ते बोलणार काय? हे चालणार नाही. म्हणून या वेस्ट इंडिजच्या प्लेअरने आपल्या तोंडाला लगाम लावावा असा घणाघात जाधवांनी बावनकुळे यांच्यावर केला होता.