नागपूर : ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’अशा घोषणा देत, फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोलताशांचा गजरात, गुलाल उधळीत, पेढे भरवीत ठिकठिकाणी निघालेल्या भाजपा उमेदवारांच्या विजयी रॅलीने अख्खे नागपूर दुमदुमले. विजयाची पताका फडकविलेल्या उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी रविवारीच दिवाळी साजरी केली. आतषबाजी व उत्साहामुळे नागपूरकरांनी दिवाळीपूर्वीच दिवाळी अनुभवली. सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. १० वाजतापासून चित्र स्पष्ट होऊ लागले. कडेकोट बंदोबस्तात असलेल्या मतमोजणी केंद्राकडे भाजप कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन गर्दी करू लागले. ११ वाजतापासून चौकाचौकात डीजेच्या तालावर कार्यकर्ते फेर धरू लागले होते. विजयी उमेदवार मतमोजणी केंद्रातून बाहेर येताच फटाक्यांची आतषबाजी, पुष्पांचा वर्षाव आणि गुलालाची उधळण होत होती. पेढे भरविण्यात येत होते. चौकाचौकात जल्लोष होत होता. कार्यकर्त्यांना पक्षाकडून लहान-मोठे झेंडे, दुपट्टे वितरित करण्यात आल्याने रॅलीचे रूप पालटत होते. कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते.(प्रतिनिधी)ठिकठिकाणी दिवाळी धंतोली येथील भाजपा कार्यालयात सकाळपासूनच पेढे भरविण्याचा कार्यक्रम आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली होती. वस्त्यांवस्त्यांमध्येही लडी फुटत होत्या. रामबाग कॉलनी येथे आतषबाजीत बुंदीचे वाटप करण्यात आले. उत्तर नागपूर विकास परिसरातर्फे इंदोरा जरीपटका रोडवर डीजे लावून, फटाक्याची आतषबाजी करण्यात येत होती. डॉ. मिलिंद माने यांच्या रॅलीच्या मार्गावर, इंदोरा आंबेडकर चौक, स्वीपर कॉलनी इंदोरा, बेझनबाग बसस्टॉप, इंदोरा चौकात डीजे लावून रॅलीचे स्वागत झाले. पश्चिम नागपुरात कुर्वेज हायस्कूलसमोर भाजपा कार्यकर्त्यांनी गुलालांची उधळण करीत आनंद साजरा केला. दक्षिण नागपुरात मानेवाडा चौकात सुधाकर कोहळे यांच्या रॅलीचे जोरदार स्वागत झाले. पूर्व नागपुरात कृष्णा खोपडे यांच्या रॅलीतील कार्यकर्त्यांचा जल्लोष लक्ष वेधून घेत होता. पश्चिममध्ये सुधाकर देशमुख यांच्या रॅलीच्या मार्गावर आतषबाजी आणि गुलालाची उधळण थांबण्याचे नाव घेत नव्हती तर मध्यमध्ये विकास कुंभारे यांच्या रॅलीवर जागोजागी पुष्पांचा वर्षाव होत होता. रॅलीमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीयविजयी उमेदवारांच्या रॅलीमध्ये महिलांची, ज्येष्ठांची उपस्थिती लक्षणीय होती. चौकाचौकात सामान्य जनताही यात सहभागी होत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक गर्दी करून उमेदवारांना शुभेच्छा देत होते. काही जण मोबाईलमध्ये हा क्षण कैद करीत होते. चौकाचौकात लावलेल्या डीजेच्या तालावर तरुण बेधूंद नाचत होते. भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांकडून उमेदवारांची आरती ओवाळून मिठाईचे वाटप केले जात होते. स्थानिक नागरिकांकडूनही रॅलीचे जोरदार स्वागत होत होते.
भाजप ‘रॉक’, काँग्रेस ‘शॉक’ !
By admin | Published: October 20, 2014 12:43 AM