भाजपा-आरपीआयचे शक्तिप्रदर्शन

By Admin | Published: May 6, 2017 06:33 AM2017-05-06T06:33:35+5:302017-05-06T06:33:35+5:30

महानगरपालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी सज्ज झालेल्या भाजपा व आरपीआय युतीच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत

BJP-RPI power demonstration | भाजपा-आरपीआयचे शक्तिप्रदर्शन

भाजपा-आरपीआयचे शक्तिप्रदर्शन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : महानगरपालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी सज्ज झालेल्या भाजपा व आरपीआय युतीच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व आरपीआय युतीच्या उमेदवारांनी निवडणूक प्रभारी व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल केले.
महापालिकेच्या केंद्रनिहाय कार्यालयात हे अर्ज भरले गेले असले तरी त्या-त्या विभागात भाजपा-आरपीआय युतीचे शक्तिप्रदर्शन पहायला मिळाले. एकूण २0 प्रभागातून ७८ जागांसाठी पनवेल महापालिकेची २४ मे रोजी निवडणूक होणार असून प्रभाग क्रमांक एक ते तीनचे अर्ज नावडे येथे, प्रभाग चार ते सहाचे अर्ज खारघर, प्रभाग सात ते दहाचे अर्ज कळंबोली, कामोठे येथे प्रभाग अकरा ते तेराचे अर्ज, तर पनवेलमधील दोन केंद्रावर प्रभाग चौदा ते वीसचे अर्ज दाखल करण्यात येत आहेत. प्रभाग २ मधून दिनेश रवींद्र खानावकर, राम महादू पाटील, कुंदा कृष्णा पाटील, लता गौरव भोईर, प्रभाग ३ मधून प्रतीक्षा प्रल्हाद केणी, प्रभाग ११ मधून संतोषी तुपे, प्रभाग १२ मधून दिलीप पाटील, पुष्पा कुत्तरवडे, प्रभाग १३ मधून डॉ. अरूणकुमार भगत, विकास घरत, हरजिंदर कोर, प्रभाग १५ मधून सीता पाटील, प्रभाग १६ मधून संतोष शेट्टी, समीर ठाकूर, डॉ. कविता किशोर चौतमोल, राजश्री महेंद्र वावेकर, प्रभाग १७ मधून अ‍ॅड. मनोज भुजबळ, प्रभाग १९ मधून परेश ठाकूर, मुग्धा लोंढे, दर्शना भोईर, प्रभाग क्र मांक २० मधून चारूशीला घरत, तेजस कांडपिळे, अजय बहिरा यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून उर्वरित उमेदवार शनिवारी अर्ज दाखल करणार आहेत.
खारघरमधील तब्बल ५० भाजपा पदाधिकाऱ्यांनी तिकीट वाटपावरून सामूहिक राजीनामे दिले आहेत. उमेदवारी अर्ज भरताना भाजपा नेत्यांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता. यामध्ये प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, तालुकाध्यक्ष अरूण भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा प्रवक्ता वाय. टी. देशमुख, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, पीआरपीचे नेते नरेंद्र गायकवाड, जिल्हाध्यक्ष सीताराम कांबळे, राजेश गायकर, भरत जाधव, नितीन मुनोत यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

खारघरमध्ये समाविष्ट तीन प्रभागांपैकी प्रभाग ५ मधून लीना गरड व वनिता पाटील या दोन उमेदवारांची नावे भाजपाने जाहीर केली आहेत. मात्र अद्याप या दोन्हीही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले नसल्याने खारघरमध्ये वेगळ्याच राजकीय घडामोडी घडत असल्याची चर्चा आहे.

भाजपा-आरपीआय युतीने जल्लोषात उमेदवारी अर्ज दाखल केले असून शनिवारी इच्छुकांची अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार यांनी जनहिताचे घेतलेले निर्णय यामुळे जनता भाजपाच्या पाठीशी आहे. अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये दाखल होत आहेत. भाजपाचे काही कार्यकर्ते नाराज असतील त्यांची नाराजी दूर करू. बंडखोर हा शब्द भाजपाच्या कोशात नाही त्यामुळे त्यांना आम्ही बंडखोर म्हणणार नाही. भाजपा सरकारने स्मार्ट शहरांचा अजेंडा ठेवला आहे, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल असा विश्वास आहे.
- रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री

भाजपा-युतीच्या ५० टक्के उमेदवारांचे अर्ज शुक्रवारी भरले असून उद्या उर्वरित उमेदवारांचे अर्ज भरले जातील. स्वयंप्रेरणेने कार्यकर्ते जल्लोषात अर्ज दाखल करीत आहेत. कामोठे, खारघर, नावडे येथेही अशाच पद्धतीने रॅली काढून अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पनवेलच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पनवेल भाजपामय झाले आहे.
- रामशेठ ठाकूर,
माजी खासदार

Web Title: BJP-RPI power demonstration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.