बुलडाणा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकविध गोष्टी बदलताना पाहायला मिळत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र सोडत होते. आता मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका न करण्याची ग्वाही किरीट सोमय्या यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, भाजप आमदार संजय कुटे आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील कटुता दूर झाल्याची चर्चा बुलडाण्यात रंगू लागली आहे.
राजकारणात कोणीही एकमेकांचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो, असे म्हटले जाते. याचा प्रत्यत बुलडाणावासीयांना आल्याचे सांगितले जात आहे. तब्बल एक वर्षांपूर्वी भाजप आमदार संजय कुटे (Sanjay Kute) व बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्यात गायकवाडांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेमुळे वादाची ठिणगी पडली होती. बघता बघता हा वाद इतका विकोपाला गेला होता की , बुलडाण्यात तणाव निर्माण झाला होता. दोन्ही आमदार महोदयांनी एकमेकांवर अक्षरशः अतिशय खालच्या पातळीवर टीका , शिवीगाळ केली होती. तर संजय गायकवाड यांनी कुटे यांना बुलडाण्यात येऊन दाखव असे आव्हानही दिले होते. त्यावेळी संजय कुटे यांनी बुलडाण्यात मोठे शक्तीप्रदर्शन केले होते.
शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये जवळीक वाढली
आता तब्बल एक वर्षांनी आता काळ बदलला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार सूरत आणि गुवाहाटीत असताना आ.संजय कुटे यांनी या आमदारांची बडदास्त केल्याचे जगजाहीर आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप आमदारांमध्ये जवळीक वाढली आहे. ही जवळीक इतकी वाढली आहे की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शेगाव दौऱ्यावेळी संजय कुटे आणि संजय गायकवाड एकत्र दिसून आले. शेगावमध्ये हे दोन्ही आमदार राज्यपालांच्या स्वागतासाठी एकत्र हार घेऊन उभे होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
दरम्यान, संजय कुटे आणि संजय गायकवाड यांच्या दिलजमाईची छायाचित्रं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. राज्यपाल महोदयांशी दोन्ही आमदार हसत खेळत असल्याचे छायाचित्रे समोर आली आहे. या सगळ्याची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगली आह. एकेकाळी एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहणारे लोकप्रतिनिधी आता सगळे काही विसरून जवळ आले होते.