मुंबई - गेल्या ३८ दिवसांपासून रखडलेला शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा मंगळवारी पार पडला. राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १८ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. यात भाजपाचे ९ आणि शिंदे गटाचे ९ जणांचा समावेश होता. मंत्रिमंडळ विस्तारानंतर काही नावांवर वाद सुरू झाला. त्याचप्रमाणे अनेकांना यादीत नाव नसल्याने धक्का बसला आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाचे चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावित, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे यांना स्थान देण्यात आले. परंतु दिल्लीतील सूत्रांनुसार या ९ जणांच्या यादीत सुरूवातीला संजय कुटे, प्रविण दरेकर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची नावे होती. पण ही नावे कापण्यात लॉबिंग करणाऱ्यांना यश आले. कापण्यात आलेली तिन्हीही नेते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे ही नावं वगळण्यासाठी दिल्लीत वजन कुणी वापरलं याबाबत विविध चर्चा सुरू आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्याच अनुभवी लोकांना वगळण्यास विरोध केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. पावणेदोन वर्षात लोकसभेची तर सव्वादोन वर्षात विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे अनुभवी चेहरे लागतीलच अशी भूमिका फडणवीसांनी पक्षश्रेष्ठींकडे मांडली. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात पक्षातील हुकलेले दिग्गज आणि नवीन चेहऱ्यांचा मेळ मंत्रिमंडळ विस्तारात घालावा लागणार आहे.
जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून तब्बल चार वेळा डॉ. संजय कुटे आमदार म्हणून निवडून आले आहेत. कुटे हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. अलीकडे एकनाथ शिंदे यांचे जे बंड झाले त्यात सूरतपासून गुवाहाटीपर्यंत शिंदे गटासोबत असलेला भाजपाचा चेहरा म्हणून कुटे समोर आले होते. तर प्रविण दरेकर यांना भाजपात आणून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदापर्यंत पोहचवण्यात फडणवीस यांचा मोठा हातभार आहे. तर नागपूरमधीलच चंद्रशेखर बावनकुळे नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आलेत. बावनकुळे हेदेखील फडणवीस यांच्या गटातील विश्वासू शिलेदार आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात या तिघांना संधी मिळेल अशी चर्चा सुरुवातीपासून होती. परंतु ऐनवेळी यादीतून ही तीन नावे वगळण्यात आली. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यात यापैकी कुणाला संधी मिळतेय हे पाहणं महत्त्वाचं आहे.