राम शिनगारे औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपामध्ये येण्यासाठी मला व शिवसेनेच्या इतर आमदारांना ५ कोटी रुपयांची आॅफर दिली होती, असा गौप्यस्फोट कन्नड-सोयगावचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी ‘लोकमत’कडे केला. हा आरोप भाजपाने फेटाळून लावला आहे.हर्षवर्धन जाधव यांनी मतदारसंघातील रस्ते दुरुस्तीसंदर्भात बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची १७ आॅक्टोबर रोजी मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली व मतदारसंघातील प्रलंबित रस्त्यांची यादीच सादर केली. यातील बहुतांश कामांना मंजुरी मिळालेली आहे. मात्र, निविदा काढण्यात येत नाहीत. दिरंगाईमुळे जनतेत रोष आहे. आमचे फिरणे मुश्कील झाले असल्याचे सांगितले. यावर चंद्रकांतदादा निर्णय घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र, उलटेच घडल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यांनी प्रश्न मार्गी लावण्याऐवजी भाजपातच का येत नाहीत, अशी विचारणा करत, पक्षात आल्यावर सर्व कामे मार्गी लागतील, आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला, तर निवडणुकीत खर्च करण्यासाठी ५ कोटी रुपयेसुद्धा मिळतील, अशी आॅफर दिली. मात्र, ती धुडकावून लावत, रस्त्यांची कामे मार्गी लावा. प्रेमाने सर्व काही मिळते. मात्र, आपण विकत घेण्याचा प्रयत्न केला, तर काहीच मिळणार नाही, असे सांगितल्याचा दावाही जाधव यांनी केला.पक्षप्रमुखांच्या दौºयानंतर निवडला मुहूर्तआ. जाधव यांना भाजपामध्ये येण्याची आॅफर १७ आॅक्टोबर रोजी देण्यात आली असेल, तर या घटनेला महिना होत आला आहे. तरी याची कोठेही वाच्यता जाधव यांनी केली नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आ. जाधव यांच्या वडिलांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात कन्नड येथे रविवारी हजेरी लावली. यानंतर, तिसºयाच दिवशी जाधव यांनी हा गौप्यस्फोट केला. पक्षप्रमुखांची मर्जी संपादन केल्यानंतर, थेट राज्य सरकारमधील शक्तिशाली मंत्र्यांवरच आरोप केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आरोपांमागे कोणते राजकारण आहे, याविषयी तर्कवितर्क सुरू आहेत.बिनबुडाचे आरोप -हर्षवर्धन जाधवयांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. आपले अपयश झाकण्यासाठी ते असले उद्योग करीत आहेत. असले उद्योग करण्याची भाजपाला गरज नाही. भाजपाकडे चांगल्या कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. - माधव भंडारी, मुख्य प्रवक्ते, प्रदेश भाजपा
पाच कोटींची भाजपाची आॅफर! शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट : भाजपाने मात्र फेटाळला आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 3:14 AM