पुणे : शहरातील अनेक प्रभागांमध्ये सबंध पॅनेल निवडून येण्याचे प्रमाण अधिक असताना रास्ता पेठ - रविवार पेठ (प्रभाग क्रमांक १७) प्रभागात क्रॉस वोटिंंग झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि शिवसेना, भाजपाचा प्रत्येकी १ उमेदवार या प्रभागाने पालिकेवर पाठविला. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असताना ३ गटांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाल्याने धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा एका गटामध्ये भाजपाला तर दुसऱ्या गटामध्ये शिवसेनेला झाला. या प्रभागामध्ये ‘अ’ गटासाठी मागासवर्गीय महिला, ‘ब’ गटासाठी सर्वसाधारण महिला, आणि ‘क’ व ‘ड’ गट खुल्या प्रवर्गासाठी असे आरक्षण होते. त्यामुळे अ गटामधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मी उदयकांत आंदेकर, ब गटामधून सुलोचना तेजेंद्र कोंढरे, क गटामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे वनराज आंदेकर आणि ड गटामधून शिवसेनेचे विशाल धनवडे निवडून आले. सर्वत्र भाजपाची लाट असताना या प्रभागातून भाजपाच्या रोहिणी बापू नाईक यांचा पराभव झाला. याच पक्षाचे उमेश चव्हाण यांचाही ३४६४ मतांनी पराभव झाला. ब गटामधून शिवसेना आणि भाजपामध्येच सामना झाला. राष्ट्रवादी काँग्रेसला येथे मैत्रीपूर्ण लढत महागात पडली. दोन्ही काँग्रेसच्या मतांची बेरीज १५ हजारपेक्षा अधिक आहे. क गटामध्ये राष्ट्रवादीचे वनराज आंदेकर यांनी बाजी मारली. मैत्रीपूर्ण लढतीचा तोटा त्यांना झाला नाही.
‘त्यांच्या’ मैत्रीपूर्ण लढतीचा फायदा भाजपा-सेनेला
By admin | Published: February 26, 2017 1:23 AM