लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे बाळाराम पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपही सज्ज असून, लवकरच उमेदवाराची घोषणा होण्याचीही शक्यता आहे. शिवसेनेत दोन गट पडल्याने या दोन्ही गटांकडून उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे या मतदार संघातील निवडणूक चौरंगी होण्याची दाट शक्यता आहे.
या जागेसाठी अद्याप कोणत्याही पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात प्रामुख्याने भाजपकडून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे पुतणे देवेश पाटील यांचे नाव चर्चेत आहे. त्याशिवाय भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांच्याही नावाची चर्चा आहे. तिकडे शिवसेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे तयारी करत आहेत, तर शिक्षक भारतीतर्फे धनाजी पाटील आणि काँग्रेसकडून उमदेवारांची चाचपणी सुरू असल्याची माहिती शिक्षक सेलच्या सूत्रांकडून देण्यात आली. शिवसेनेत दोन गट असल्याने दोन्ही गटांकडून उमेदवार दिले जातील, अशी शक्यता आहे.
गेल्यावेळी निवडणुकीत भाजपला बंडखोरीमुळे पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आतापासूनच पक्षाने तयारी सुरू केली आहे. शिक्षक परिषदेने रामनाथ मोते यांना दोनवेळा उमेदवारी दिली. तिसऱ्यांदा मोते यांना उमेदवारी नाकारत शिक्षक परिषदेचे वेणूनाथ कडू यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे मोतेंनी बंडखोरी केली. सेनेतर्फे ज्ञानेश्वर म्हात्रे व शिक्षक भारतीतर्फे अशोक बेलसरे यांनी तर प्रथमच शेकापने यात उडी घेऊन बाळाराम पाटील यांना रिंगणात उतरवले आणि मत विभागणीचा फायदा बाळाराम पाटील यांना मिळाला. त्यामुळे यंदा कोणत्याही परिस्थितीत बंडखोरी होऊ द्यायची नाही, हा भाजपचा प्रयत्न आहे.
मतदारसंघातील जिल्हे
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर
मागील निवडणुकीत मतांची आकडेवारी
बाळाराम पाटील(शेकाप) ११,८३७ज्ञानेश्वर म्हात्रे (शिवसेना) ६,८८७रामनाथ मोते (बंडखोर शिक्षक परिषद) ५९८८ अशोक बेलसरे (शिक्षक भारती) ४५३३
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"