मुंबई : भाजपा-शिवसेना युती म्हणजे, ‘तुझे माझे जमेना अन् तुझ्या वाचून करमेना’ अशी आहे. नवरा-बायकोमध्ये कधी-कधी आदळआपट होत असते, पण संबंध तुटत नाहीत, अशी टिप्पणी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केली.हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली युती होती आणि तोच विचार आजही कायम आहे. अकाली दल, शिवसेना आणि नितीशकुमार यांचा पक्ष सुरुवातीपासूनच आमच्यासोबत आहेत, असे सांगत, गडकरी यांनी शिवसेनेला गोंजारले आणि ते स्वत:ही युती होण्याच्या बाजूचे असल्याचेच त्यांनी स्पष्टपणे सूचित केले. भाजपा-शिवसेनेत तुटण्याची वेळ आली, तर आपण मध्यस्थी करणार का आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून परतण्याची आपली इच्छा आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले की, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सक्षम आहेत. मध्यस्थी करण्यासाठी मला वेळ नाही. मी महाराष्ट्रात परतण्याचा प्रश्नच नाही. तशी माझी इच्छाही नाही. दिल्लीची हवा मला मानवली आहे आणि मी तिथे खूश आहे.पालघर, तसेच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम मशिन मोठ्या प्रमाणात बिघडल्याने त्याचा मतदानावर परिणाम झाला, ही अतिशय गंभीर बाब आहे. त्याची आयोगाने तितकीच गंभीर दखल घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले. पालघरच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांनी साम-दाम-दंड-भेदची भाषा केली. याकडे लक्ष वेधले असता, गडकरी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना मी त्यांच्या लहानपणापासून ओळखतो. ते असे बोलू शकत नाहीत. जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, या अर्थाने ते बोलले असावेत.काँग्रेसच्या सहकार्याशिवायविदर्भ राज्यनिर्मिती शक्य नाहीस्वतंत्र विदर्भ राज्याप्रमाणेच लहान राज्ये व्हावीत, हीच भाजपाची भूमिका आहे. विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी संसदेत दोन तृतीयांश बहुमताने घटनादुरुस्ती ठराव मंजूर करावा लागेल आणि काँग्रेसच्या सहकार्याशिवाय ते शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.संघ कार्यक्रमात मुखर्जींनी जाण्यात गैर काय?माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समारोपास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यावरून वादळ उठले असताना गडकरी यांनी मात्र, मुखर्जींनी संघाच्या कार्यक्रमात जाण्यात गैर काय, असा सवाल पत्रकारांनाच केला. ते म्हणाले की, ए. बी.बर्धन भाकपाचे राष्ट्रीय सरचिटणीस असताना मी भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो. तेव्हा त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. राजकीय अस्पृश्यता ठेवणे चुकीचे आहे अन् संघ काय आयएसआय आहे का ती तर राष्ट्रवादी संघटना आहे, असे गडकरी म्हणाले.बुलेट ट्रेन, नाणारलाविरोध करणे चुकीचेबुलेट ट्रेन, नाणार रिफायनरीसारख्या प्रकल्पांना विरोध करणे चुकीचे आहे. विकासावरून राजकारण होता कामा नये. आज अत्याधुनिक तंत्रज्ञान आले आहे. नाणारमुळे कोकणचे पर्यावरण धोक्यात येणार नाही. एन्रॉनला विरोध करणारे तो बंद पडल्यावर पुन्हा सुरू करण्यासाठी आले होते, याची आठवण देत गडकरी म्हणाले की, बुलेट ट्रेनचा फायदा गुजरातलाच होणार हे खरे नाही. देशभर त्याचे जाळे विणले जाईल.
भाजपा-शिवसेनेची युती म्हणजे ‘तुझे माझे जमेना, तुझ्याविना करमेना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 6:08 AM