विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत मोठा भाऊ असलेल्या शिवसेनेने १७१ आणि लहान भाऊ भाजपने ११७ जागा लढविल्या होत्या. दोन्ही आकड्यांची बेरीज ९ होते. हा आकडा लकी असल्याचे सांगत शिवसेनेने जागावाटपाच्या या सूत्राचा आग्रह धरला होता. यावेळी भाजपकडूनही असाच ‘लकी’ फॉर्म्यूला शिवसेनेसमोर ठेवला जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
भाजपने १६२ आणि शिवसेनेने १२६ जागा लढवाव्यात असा फॉर्म्यूला भाजपकडून चर्चेदरम्यान दिला जाईल. रणनीतीचा एक भाग म्हणून सुरुवातीला १६२ पेक्षाही अधिक जागा मागायच्या पण यापेक्षा खाली यायचे नाही, असे भाजपच्या गोटात ठरले असल्याचे सांगण्यात येते.१९९५ च्या निवडणुकीत १७१-११७ चा फॉर्म्यूला स्वीकारत युतीने दमदार यश मिळविले. नंतरच्या निवडणुकीपासून हा फॉर्म्यूला बदलला आणि युतीची सत्ता येऊ शकली नाही. २०१४ मध्ये भाजप-शिवसेनेने निवडणूक स्वतंत्रपणे लढविली होती.भाजपकडून आढाव्याच्या ज्या बैठकी विविध पातळ्यांवर सध्या होत आहेत त्यात शिवसेनेशी युती नक्कीच केली जाईल, असे सांगितले जात आहे पण त्याचवेळी स्वबळावर लढण्याचा पर्यायदेखील भाजपने खुला ठेवला आहे. शिवसेनेने जागावाटपात अवास्तव मागणी केली तर युती तोडायची असे घाटत आहे.
युतीबाबत बोलण्याचामला अधिकार : पाटीललोकसभा निवडणुकीवेळी युतीचा फॉर्म्यूला अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी ठरविला होता. त्या बैठकीला मी नव्हतो. मात्र, आज भाजपचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने युतीबाबत बोलण्याचा अधिकार मला आहे. युतीचा निर्णय मात्र वरील तीन नेतेच घेतील, असा टोला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज नवी मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना हाणला.जागा वाटपाबाबत आमचे ठरले आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच स्पष्ट केले होते. त्यावर, जागावाटप ते तिघेच ठरवतील पण युतीबाबत बोलण्याचा अधिकार मला आहे, असे पाटील म्हणाले.