मुंबई - लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर एक्झिट पोलच्या माध्यमातून अनेकांनी निवडणूक निकालांचे अंदाज वर्तवले आहेत. टीव्ही 9 मराठी आणि सी-व्होटर यांनी एकत्रित केलेल्या सर्व्हेमधून लोकसभा निवडणुकांचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रातील जागांचा अंदाज देण्यात आला आहे. यामध्ये भाजपा-शिवसेना युतीला 34 जागा तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 14 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 22 जागा, शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा तर काँग्रेसला 2 जागा्ंवर समाधान मानावं लागलं होतं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या 22 जागांवरुन 19 जागांवर घसरण होईल तर शिवसेनेच्या खासदारांची संख्याही कमी होईल. शिवसेना यंदाच्या निवडणुकीत 15 जागा जिंकेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाढताना पाहायला मिळत आहे. काँग्रेसला 8 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
तर एबीपी माझा आणि नेल्सनच्या एक्झिट पोलमधून महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 17 जागा शिवसेना, भाजपा 17 जागा, काँग्रेस 4 जागा तर राष्ट्रवादीला 9 जागा मिळताना पाहायला मिळत आहेत तर इतर 1 जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळताना दिसत आहेत.
23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. मात्र त्याआधी विविध चॅनेल आणि दैनिकांनी सर्व्हेच्या माध्यमातून जनतेचा जाणून घेतलेला लोकसभेचा मुड यावरुन निवडणूक निकालांचे अंदाज बांधण्यात येतात. निवडणूक निकालांच्या या सर्व्हेवरुन देशात कोणाचं सरकार येणार हे सांगितले जाते. निवडणूक प्रचारादरम्यान विविध संस्थांनी मतदारांमध्ये जात वेगवेगळ्या मुद्द्यावरुन राजकीय पक्ष, उमेदवार यांचा विजय, पराभव याची गणिते मांडली जातात. सी-व्होटर, सीएसडीएस, नेल्सन, लोकनिती, चाणक्य यासारख्या संस्था ओपिनियन पोल घेत असतात. या संस्थांची आपली स्वत:ची टीम असते, जी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाऊन लोकांची मते जाणून घेते.