मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी राज्यात सत्तारुढ भाजपा-शिवसेनेत युती झाली. दोन्ही पक्ष प्रत्येकी तीन जागा लढवतील. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा घोळ मात्र कायम आहे.अमरावतीत प्रवीण पोटे हे भाजपाचे उमेदवार असतील. चंद्रपूर-वर्धेतून पक्षसंघटनेत दीर्घकाळ काम करीत असलेले रामदास आंबटकर यांना भाजपाने संधी दिली आहे. लातूर-बीड-उस्मानाबादच्या उमेदवारीचा निर्णय झाला नसला तरी माजी राज्यमंत्री सुरेश धस यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.शिवसेनेने नाशिकमध्ये नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने उमेदवारी नाकारलेले शिवाजी सहाणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. दराडेंनी ऐनवेळी शिवसेनेत येऊन उमेदवारी मिळविली. परभणी-हिंगोलीमध्ये शिवसेनेने अकोल्यातील पक्षाचे विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव यांना आधीच उमेदवारी दिली आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये अॅड. राजीव साबळे यांना मैदानात उतरविले आहे.लातूर-बीड-उस्मानाबादमध्ये भाजपा-शिवसेनेपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीकडे तब्बल ९४ मते अधिक आहेत, पण कागदावरील गणित बिघडविण्यासाठी भाजपा प्रतिष्ठा पणाला लावेल, असे दिसते. भाजपाकडून दावेदार असणाऱ्या रमेश कराड यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी पक्षप्रवेश देत निवडणूक रिंगणात उतरविले. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीचा निर्णय न झाल्यामुळे कराड यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली.परभणी-हिंगोलीत युतीकडे १५० तर आघाडीकडे तब्बल २९० मते आहेत. मात्र, अकोल्यात शिवसेनेकडे जास्त मते नसूनही विधान परिषदेची निवडणूक जिंकून दाखविणारे गोपीकिशन बाजोरिया आपल्या मुलासाठी सर्व प्रकारच्या शक्कली लढवतील. बुधवारी काँग्रेसकडून माजी आ़ सुरेश देशमुख यांनी तर शिवसेनेकडून विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले़ सुशीलकुमार देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला़आघाडीचा निर्णय नाहीकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते दिल्लीत या बाबत निर्णय घेऊन कळवतील, असे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.चंद्रपूर-वर्धा, अमरावती आणि लातूर-बीड-उस्मानाबाद या तीन जागा भाजपा लढविणार असून नाशिक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग व परभणी-हिंगोली या तीन जागा शिवसेना लढवेल.संख्याबळाचा विचार केला तर चंद्रपूर-वर्धा, अमरावती दोन जागांवरील भाजपाचा विजय निश्चित मानला जातो. नाशिकमध्ये युती घट्ट राहिली तर शिवसेनेचा विजय पक्का असेल. कालपर्यंत शिवसेनेत असलेले शिवाजी सहाणे यांना राष्ट्रवादीने दिलेली उमेदवारी शिवसेनेसाठी धोक्याची ठरू शकते.
विधान परिषद निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 5:25 AM