पुणे - विकासाचे नाव घेत निवडून आलेले भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. विकासाच्या नुसत्याच बाजारगप्पा आपल्याला ऐकायला मिळतात. प्रत्यक्षात मात्र विकासकामे कोठेही दिसत नाही. आघाडीचे सरकार असताना राज्यावर २ लाख ८० हजार कोटींची कर्ज होते. मात्र सद्याच्या सरकारने कर्जमाफी आणि पायाभूत सुविधांचा विकासाच्या नावाखाली तब्बल ८ लाख कोटींचा कर्जाचा डोंगर राज्यावर लादला आहे, असा थेट आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर केला.
पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ४५ आंगणवाडी सेविका, मदतनिस आणि पर्यवेक्षिका यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रम झाला. यावेळी अजित पवार बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, महिला बालकल्याण सभापती राणी शेळके, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, प्रभारी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपक चाटे उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, राज्य सरकारला मागील तीन वर्षांत कोणत्याच घटकाचे प्रश्न सोडविता आले नाही. त्यामुळे सामान्यांना रस्त्यावर वारंवार उतरावे लागत आहे. आंगणवाडी सेविकांचा मानधनाची मागणी रास्त आहे. त्यांना मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंजे आहे. परंतू या सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. कोणीही आंदोलन आनंदाने करत नसते. मात्र सरकारला याचे गांभीर्यच नसल्याचे दिसून येते. आता या आंगणवाडी सेविका आपल्या न्याय मागण्यांसाठी पुन्हा राज्यभर आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
विश्वास देवकाते म्हणाले, मुलींना शिकविल्यास देशाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. सावित्रीबाई फुले यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्यामुळेच आज महिला सगळ्या क्षेत्रात प्रगती करत आहे. जिल्ह्यातील आंगणवाडी सेविका अडीच लाख बालकांवर संस्काराचे मोठे काम करत आहे. त्यामुळे त्यांचा आपण सर्वांनी गौरव करणे कर्तव्यच आहे.
सूरज मांढरे म्हणाले, आपल्या देशात मनुष्यबळ मोठे आहे. परंतू त्याला प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. आपले मनुष्यबळ प्रशिक्षित नसल्याने जगभरातील कंपन्या हजारो कोटींची गुंतवणूक करण्यास धजावत नाही. आपले मनुष्यबळ प्रशिक्षित झाल्यास हजारो कोटींची गुंतवणूक भारतात चालून येईल. त्यातून रोजगार निर्मिती होईल. सध्या आंगणवाडी सेविका कठिण परिस्थितीत उत्तम काम करत आहेत. त्यामुळे बाल वयात चिमुकल्यांवर चांगले संस्कार घडत आहेत.
याप्रसंगी आंगणवाडी सेविकांना साडी-चोळी, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी भेट देण्यात आली. तसेच बारामती येथील आक्षय फाऊंडेशनच्या वतीने आंगणवाड्यांना ८३ लाख रूपय किंमतीचे गॅस शेगडी वाटप करण्यात आले.
देव करो पालकमंत्र्यांची भविष्यवाणी खरी ठरो
सन २०१४ साली भाजप-शिवसेनेने मोठमोठी आश्वासने दिली आहेत. ती सर्व आश्वासने मागील तीन वर्षात पूर्ण झाली नाही. आता त्यांचेचे मंत्री जाहीर वाच्यता करायला लागले आहेत. हा एकप्रकारे त्यांना घरचा आहेर आहे. पुण्याचे पालकमंत्र्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरल्यास आम्ही २०१९ मध्ये सत्तेवर आल्यास आंगणवाडी सेविकांचे प्रश्न तातडीने सोडवू. या सरकारवर कोणत्याही घटकाचा विश्वास राहिल्या नसल्याचे असेही अजित पवार या वेळी म्हणाले.