- नितीन अग्रवालनवी दिल्ली : राज्य विधानसभेच्या २८८ पैकी १४४ जागा आपण लढवाव्यात आणि शिवसेनेला १२६ जागा सोडाव्यात, असे भाजपने ठरविले असून, उरलेल्या १८ मतदारसंघ मित्रपक्षांसाठी सोडण्यावरही भाजपमध्ये एकमत झाले आहे. भाजपने १४४ पैकी १00 उमेदवारांची नावेही निश्चित केली असून, ती २९ सप्टेंबर रोजी वा त्यानंतर घोषित केली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्यास भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी तयारी दर्शवली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, प्रदेश भाजपचे संघटन सचिव विजय पुराणिक यांनी गुरुवारी दिल्लीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा, नितीन गडकरी, भूपेंद्र यादव, सरोज पांडे आदी केंद्रीय नेत्यांशी शिवसेनेला सोडावयाच्या जागा व संभाव्य उमेदवारांची नावे यावर प्रदीर्घ चर्चा केली. या बैठकीत शिवसेनेसाठी १२६ जागा सोडण्याचे भाजपने नक्की केल्याचे सांगण्यात आले. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती या मित्रपक्षांना मिळून १८ जागा सोडण्यावरही यावेळी एकमत झाले.
मात्र हे चारही पक्ष भाजपचे मित्रपक्ष म्हणून ओळखले जातात. त्यामुळे भाजप व मित्रपक्षांना मिळून अधिक जागा मिळणार, हे यातून स्पष्ट झाले आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने किमान १0 जागा मिळाव्यात, असा आग्रह धरला असला तरी त्या पक्षाला तीन ते पाच जागाच मिळू शकतील, तर राष्ट्रीय समाज पक्षाला एक वा दोन जागा सोडल्या जातील, असे कळते. शिवसंग्राम व सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांतीला प्रत्येकी एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यातही शिवसंग्राम व रयत क्रांती कदाचित भाजपच्या निवडणूक चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. म्हणजेच मित्रपक्षांना १0 पेक्षा अधिक जागा मिळणे अवघड आहे, असे समजते. परिणामी शिवसेना-भाजप युतीमध्ये भाजपचाच अधिक फायदा होण्याची चिन्हे आहेत.
या फॉर्म्युल्यास शिवसेनेची तयारी नसल्यास भाजपने सर्व २८८ जागा लढवाव्यात, असेही मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. पण मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना १२६ जागांवर तयार होईल, असे भाजपच्या राज्यातील नेत्यांना वाटत असून, त्यामुळे युती होण्यात अडचणी नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. अर्थात आपण १२६ पेक्षा अधिक जागा शिवसेनेसाठी सोडू नयेत, असे केंद्रीय नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता, फडणवीस सरकारने केलेली कामे आणि अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची झालेली अडचण यांमुळे आपण स्वबळावरही बहुमत मिळवू शकतो, अशी भाजप नेत्यांची खात्री आहे. तरीही सन्मानपूर्वक तोडगा म्हणून शिवसेनेसाठी १२६ जागा सोडण्यावर भाजप नेतृत्वाचे एकमत झाले, असे सांगण्यात आले.गेल्या विधानसभेत काय झाले होते?गेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपने २६0 जागा लढवून १२२ जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेने २८२ जागांवर उमेदवार उभे केले होते आणि त्यापैकी ६३ जागांवर विजय मिळविला होता. भाजपला बहुमतासाठी केवळ २३ जागा कमी पडल्याने शिवसेनेशी नंतर युती झाली होती.