ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - भाडे नियंत्रण कायद्यात सुधारणेच्या मुद्यावरून राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी केलेला खुलासा पाहता भाजप व शिवसेना सरकार चालवत आहेत की पोरखेळ करीत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.अचानक गृहनिर्माण मंत्री भाडे नियंत्रण कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्तावच विचाराधीन नसल्याचे सांगत असतील तर इतके दिवस हे सरकार झोपले होते का, असा प्रश्न उपस्थित होतो. जर असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नव्हता; तर पहिल्याच दिवशी स्पष्टीकरण देऊन सरकारने हा वाद का संपवला नाही? वातावरण चिघळेपर्यंत प्रतीक्षा का केली गेली? या प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली पाहिजे.या प्रकरणात शिवसेनेचीही भूमिका हास्यास्पद आहे. शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी असून, सदरहू प्रस्ताव विचाराधीन आहे की नाही, याची शहनिशा न करता ते थेट आंदोलकाच्या भूमिकेत उतरले. सरकारमध्ये काय सुरू आहे, याची शिवसेनेला अजिबातच कल्पना नसल्याचे या प्रकारातून सिद्ध झाले.
सचिन अहिर यांची संतप्त प्रतिक्रिया -
मुंबईतील लाखो भाडेकरुंवर वाढीव भाड्याचा भार लादणारा प्रस्तावित भाडे नियंत्रण कायदा रद्द करण्याची सरकारने केलेली घोषणा हा मुंबईकरांचा विजय आहे, अशा शब्दांत माजी गृहनिर्माण राज्यमंत्री मा. श्री. सचिन अहिर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा प्रस्तावित कायदा रद्द व्हावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन जनमताचा रेटा निर्माण करणार्या सर्वांचे त्यांनी यावेळी आभारही मानले. तसेच बीडीडी चाळ पुनर्विकास, धारावी पुनर्विकास प्रकल्प तसेच नव्या गृहनिर्माण धोरणातही मुंबईकरांच्या हिताच्या तरतुदींचा समावेश व्हावा यासाठी पाठपुरावा सुरुच ठेवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.