मुंबई - महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेने घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा आता सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीचंच सरकार स्थापन होईल आणि देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनतील, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आज मुख्यमंत्र्यांचे निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील, याचा पुनरुच्चार केला. ''देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत आणि संपूर्ण भाजपा मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे आहेत. तसेच राज्यामध्ये येत्या काही काळात भाजपा-शिवसेना महायुतीचं सरकार स्थापन होईल,'' असे चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी महायुतीच्या चर्चेसंदर्भातील चेंडूही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या कोर्टात टोलावला. ''राज्यात महायुतीला जनादेश मिळाला आहे. त्या जनादेशाच आदर करून आम्ही सरकार स्थापन करू. शिवसेनेकडून सत्तास्थापनेबाबत कुठलाही प्रस्ताव आम्हाला मिळालेला नाही. आता ते लवकरात लवकर प्रस्ताव देतील अशी अपेक्षा आहे. शिवसेनेसाठी भाजपाची दारे २४ तास खुली आहेत. आम्ही शिवसेनेची वाट पाहू,''असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.