नागपूर: नागपूरात हिवाळी अधिवेशनाचा दूसरा दिवस सुरु असून या अधिवेशनामध्ये आज शिवसेना आणि भाजपाच्या आमदारांमध्ये सभागृहातचं हाणामारी झाली असल्याचे समोर आले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (सोमवारी) देखील भाजपाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला होता. यानंतर काही वेळ वादळी चर्चा रंगल्यानंतर सभागृहाचं कामकाज बंद करण्यात आले होते. त्यातच आज थेट आमदारांमध्येच हाणामारी झाल्याने सभागृहात मोठा गोंदळ उडला आहे.
भाजपाने आज सभागृहात शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यत कामकाज स्थगित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यानंतर या विषयावर चर्चा सुरु असताना शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यामध्ये हाणामारी झाली. यानंतर भाजपाचे आमदार आशिष शेलार, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार घडल्यानंतर सभागृहाचे कामकाज 30 मिनिटं स्थगित करण्यात आले होते. यानंतर सभागृहात जे घडलं ते आजपर्यंतच्या इतिहासात अत्यंत चुकीचं घडलं. एकमेकांच्या अंगावर जाण्याचा कुणाला अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांसमोर बॅनर फडकावणं चुकीचं आहे, सत्ताधारी आणि विरोधकांना मी समज देतो असं सांगत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा सभागृहाचं कामकाज सुरु केलं आहे.
भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज शेतकऱ्यांना 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. तसेच मदत मिळेपर्यत सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात यावं अशी मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्तेत असताना फडणवीसांनी शेतकऱ्यांना मदत का दिली नाही? महाराष्ट्राचा पैसा केंद्राला परत का पाठवला असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला. तसेच विरोधकांना आज शेतकऱ्यांचा पुळका आलेला आहे, तुमचा पुळका नाटकी आहे हे जनता समजून आहे, आम्ही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत देणार असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.