मुंबई - 2019 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक शिवसेना आणि भाजपा एकत्रितपणे लढवणार आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत वापरेलला फॉर्मुला वापरण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी शहा-उद्धव यांच्या भेटीमध्ये तोडगा निघाला आहे. तेलगू देसम पार्टीने आपला पाठिंबा काढून घेतल्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रीपदे शिवसेनेला देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी युतीचा प्रस्ताव फेटाळला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय अंतिम असेल. पण सध्या तरी युतीवर माझ्यापर्यंत काही आलेले नाही. या सर्व बातम्या त्यांनी पेरल्या आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या ‘मातोश्री’ भेटीबाबत बोलणे टाळले; मात्र ‘साम-दाम-दंड-भेद’वाल्यांना पालघरमध्ये शिवसेनेने घाम फोडला, असा टोला हाणत पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.