मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी मनसे-भाजपा-शिवसेना या तिन्ही पक्षात चर्चा सुरू असून लवकरच याबाबत अधिकृत माहिती समोर येणार आहे. परंतु मनसेला महायुती घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे आजचे दौरेही रद्द झाले आहेत. राज ठाकरे आज दक्षिण मुंबईसह इतर भागात मतदारसंघनिहाय दौरा करणार होते. मात्र आता हे काही काळ स्थगित करण्यात आलं आहे.
मनसे-भाजपा-शिवसेना यांच्यात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. मागील वर्षभरात राज ठाकरे आणि भाजपा-शिवसेना नेत्यांची जवळीक वाढली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरेंसोबत गाठीभेटी सुरू होत्या. मनसेला महायुतीत कसं सोबत घ्यायचं यावर गेल्या काही महिन्यांपासून चाचपणी सुरू होती. दिल्लीतही मनसेबाबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यात आली. नेमका फॉर्म्युला कसा असावा यावर चर्चा होत होती. मनसेला सोबत घेतले तर त्यांना कोणाच्या कोट्यातून जागा द्यायची यावर विचार सुरू होता.
मनसेसोबत आल्यास त्यांना १ किंवा २ जागा सोडण्यास महायुतीची आहे. पण मनसे उमेदवाराने महायुतीच्या चिन्हावर जागा लढावी असा प्रस्ताव होता. पण ही अट राज ठाकरेंनी मान्य केली नाही. उमेदवार असेल तर तो मनसेच्या चिन्हावरच लढेल यासाठी राज ठाकरे आग्रही आहेत. सध्या यावर चर्चा सुरू आहे. लोकसभेला १-२ जागा सोडल्या तर विधानसभेला सन्मानपूर्वक जागा मनसेला देऊ असंही भाजपाने सांगितले आहे. फॉर्म्युल्यावर सध्या विचारविनिमय महायुतीत सुरू आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आजचा दौराही रद्द केला आहे.
राज ठाकरेंना सोबत घेण्यात भाजपा-शिवसेना उत्सुक आहे. ठाकरेंसारखा ब्रँड महायुतीला हवा आहे. राज ठाकरेंनी आजपर्यंत एकला चलो रेची भूमिका घेतली. मात्र निवडणुकीत त्यांना फारसे यश आले नाही. परंतु मनसे आणि राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग मुंबई, नाशिक, पुणे यासारख्या शहरांमध्ये आहेत. त्यामुळे त्याचा निश्चित उपयोग महायुतीला होऊ शकतो. त्यामुळे मनसेला सोबत घेतले तर लोकसभेला १ किंवा २ जागा अथवा कदाचित राज्यसभेची १ जागाही सोडण्याबाबत विचार सुरू आहे. त्यात आज किंवा उद्यापर्यंत काही मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे.