लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राणीबागेच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावावर आतापर्यंत मौन असलेल्या भाजपाने अचानक यू-टर्न घेत, शिवसेनेची झोप उडवली आहे. या शुल्कवाढीवर काँग्रेसने यापूर्वीच आक्षेप घेतला आहे. त्यात भाजपानेही विरोधाचा झेंडा फडकावून सत्ताधारी शिवसेनेची कोंडी करण्याची तयारी केली आहे. महापालिकेत जवळपास समान संख्याबळ असलेले भाजपा विरोधकांशी हातमिळवणी करून हा प्रस्ताव फेटाळण्याची दाट शक्यता आहे.भायखळा येथील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयातील पेंग्विन कक्षावरून अनेक वाद निर्माण झाले. यात आघाडी घेत भाजपाने सर्वप्रथम शिवसेनेवर निशाणा साधला होता. मात्र, त्यानंतर पेंग्विन दर्शन व राणीबागेच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावावर भाजपाने मौन बाळगले होते.गटनेत्यांच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाला, तेव्हाही भाजपाने आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. नुकताच हा प्रस्ताव बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत मंजूर झाला. त्यावेळेसही बघ्याची भूमिका घेणाऱ्या भाजपाने आता शिवसेनेला अडचणीमध्ये आणले आहे.राणीच्या बागेत सध्या १२ वर्षांखालील मुलांसाठी दोन रुपये, तर प्रौढांसाठी पाच रुपये आकारण्यात येतात. यात वाढ करीत आई-वडील आणि दोन मुलांना १०० रुपये, त्यांच्याबरोबर तिसरे अपत्य असल्यास प्रत्येकी २५ रुपये अतिरिक्त शुल्क घेतले जाणार आहेत. तर मुलांसाठी २५ रुपये आणि प्रौढांसाठी प्रत्येकी शंभर रुपये आकारण्यात येतील. मात्र, भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी टिष्ट्वट करून या प्रस्तावाला विरोध केला आहे. राणीबागेत सोयी-सुविधा नसताना शुल्क वाढवणे म्हणजे पर्यटक आणि नागरिकांवर अन्याय असल्याचे मत शेलार यांनी आयुक्त अजय मेहता यांच्याकडे पत्राद्वारे व्यक्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई मेट्रो ३ प्रकल्पासाठी, गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीतील हरित पट्ट्यातील ३३ हेक्टर जागा दिली जाणार आहे. मात्र, यासाठी चार हजार झाडांचा बळी देऊन कारशेड उभारली जाणार आहे. या प्रस्तावाला पूर्वीपासून शिवसेनेचा विरोध आहे. आता काँग्रेसनेही हीच भूमिका घेतल्यामुळे विरोधकांच्या मदतीने भाजपाच्या या प्रस्तावाला सुरुंग लावण्याची तयारी शिवसेनेने केली आहे.नरिमन पॉइंट ते अंधेरी सीप्झपर्यंत धावणाऱ्या मेट्रो-३च्या कारशेडसाठी आरे वसाहतीची जागा निश्चित करण्यात आली आहे. मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यात कारशेडसाठी जागेचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. आरेच्या एकूण जागेपैकी ३३ हेक्टर जागा मेट्रो कारशेड, वर्कशॉप, वाणिज्य सी १ वापरासाठी आरक्षित करा, असा प्रस्ताव नगर विकास विभागाने महापालिकेकडे पाठवला आहे. या सूचनेप्रमाणे पालिकेने आरेमधील आरक्षणात बदल करण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीसमोर सादर केला आहे. मात्र, पालिका निवडणुकीत शिवसेनेचे ८४ आणि भाजपाचे ८२ असे जवळपास समान सदस्य निवडून आले आहेत. यामुळे सुधार समितीतही शिवसेना आणि भाजपाची सदस्य संख्या समान आहे. राज्य सरकार भाजपाचे असल्याने, मेट्रो प्रकल्पासाठी लागणारी आरेची जागा मिळवून देण्यासाठी भाजपाचे सदस्य हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. आरेमधील वृक्षतोडीस भाजपा वगळता, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व सर्वच पक्षांचा विरोध असल्याने, सुधार समितीच्या पुढच्या बैठकीत या प्रस्तावावरून भाजपा आणि इतर पक्षांत नव्याने खडाजंगी होण्याचे संकेत आहेत.