ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - राज्यात सध्या शेतकरी संपाचा विषय तापत असून यावरुनच सत्तेत असूनही नेहमी एकमेकांविरोधात भूमिका घेणा-या भाजपा आणि शिवसेनेचं फिस्कटलं असल्याचं दिसत आहे. बुधवारी होणा-या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे शिवसेना नेत्यांनी पाठ फिरवत पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि आरोग्य मंत्री दीपक सावंत बैठकीला गैरहजर राहिले.
यासंबंधी बोलताना शिवसेना मंत्र्यांनी बहिष्कार टाकला नाही, त्यांनी अनुपस्थित राहण्याची परवानगी मागितली आणि मुख्यमंत्र्यांनी ती दिली असा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. तर दुसरीकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंशी बोलून निर्णय घेऊ, आज आम्ही उपस्थित राहणार नाही असं सांगत शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्याकडे परवानगी मागितली असं सांगितलं आहे.
मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना सुभाष देसाई आणि दीपक सावंत दिवाकर रावतेंच्या दालनातच होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शेतक-यांच्या बदनामीचा प्रयत्न करु नये असा सज्जड दमच भरला आहे.