Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आताच्या घडीला अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. यातच ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका करताना आपला मोर्चा राजघराण्याकडे वळवत निशाणा साधला. याला आता प्रत्युत्तर देण्यात येत आहे. उदयनराजे यांच्यानंतर शिवेंद्रराजे यांनी संजय राऊतांना सुनावले आहे.
भाजपाने कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान केला नाही. पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमत होते आता पंत साताऱ्यात नेमणूका करू लागलेत. हे महाराष्ट्राला मान्य नाही. ही स्वाभिमानी गादी आहे असे विधान करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार छ. उदयराजने भोसले, आमदार छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर खोचक टीका केली. याला शिवेंद्रराजे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
छत्रपतींच्या घराण्यातील वंशजांकडे पुरावे मागणाऱ्याला महत्त्व देत नाही
महाराष्ट्रात संजय राऊत यांच्या वक्तव्याला कुणीही फारसे महत्त्व देत नाही. छत्रपतींच्या घराण्यातील वंशजांकडे पुरावे मागणाऱ्या या व्यक्तीला जनताच उत्तर देईल, अशा शब्दात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. दुसरीकडे, काहींचा स्वभावच विकृत असतो. परंतु, या विकृतीची जेव्हा वाढ होते, त्यावेळी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जाते. तुमचा उरला-सुरला पक्ष वाढवण्यासाठी जरूर काम करावे. पण, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊनच तुमचा पक्ष उभा आहे. त्यामुळे राजघराण्याबाबत बोलताना थोडीतरी लाज बाळगा, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी संजय राऊत यांना लगावला. दरम्यान, अशा प्रवृत्ती व्यक्तिकेंद्रित आहेत. परंतु, त्यांनी मोजून-मापून वक्तव्य केले पाहिजे. लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग व्हावा, ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेवरच आज भारत सर्वांत मोठी लोकशाही असणारा देश आहे. लोकशाही मानता, मग जाती-धर्मात का मतभेद आहेत? ज्यांच्यावर टीका केली त्यांच्याच मांडीला मांडी लावून का बसता? विकृत लोक सत्तेत राहण्यासाठी काहीही गरळ ओकत असून, ही निर्लज्जपणाची हद्द असल्याची टीका उदयनराजे भोसले यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"