भाजप शिवसेनेचे सरकार आंधळे म्हणूनच दुष्काळ दिसत नाही - खा. अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 08:32 PM2018-10-25T20:32:24+5:302018-10-25T20:32:29+5:30
संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतो आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पण सरकारच्या लेखी लातूर जिल्ह्यातल्या फक्त एका तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. सरकार आंधळे आहे त्यामुळेच सरकारला भीषण दुष्काळ दिसत नाही
लातूर - संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतो आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पण सरकारच्या लेखी लातूर जिल्ह्यातल्या फक्त एका तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. सरकार आंधळे आहे त्यामुळेच सरकारला भीषण दुष्काळ दिसत नाही, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या तिस-या टप्प्याच्या दुस-या दिवसाची सुरुवात आज बाभुळगाव येथून राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या समाधीचे दर्शन घेऊन झाली. त्यानंतर उदगीर येथे भव्य जनसंघर्ष सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात,हर्षवर्धन पाटील यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सभा संपल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी उदगीर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांशी चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, संपूर्ण लातूर जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे. लोकांना प्यायला पाणी नाही. खरीप वाया गेले आहे रब्बीची पेरणी झाली नाही. जनावरांना चारा नाही. लोकांच्या हाताला काम नाही. संपूर्ण लातूर जिल्हा दुष्काळाने होरपळतोय. मात्र शिरूर अनंतपाळशिवाय इतर कोणत्याही तालुक्यात दुष्काळ नसल्याचा जावईशोध या सरकारने लावला आहे. मुख्यमंत्र्यांना चष्मा लागला आहे म्हणून त्यांना लातूर जिल्ह्यातला दुष्काळ दिसत नाही का?दुष्काळाबाबत आढावा बैठका घेताना मुख्यमंत्री लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाहीत. फक्त अधिकाऱ्यांना बोलावून दुष्काळाची माहिती घेतात. त्यामुळेच सरकारला खरी परिस्थिती काय आहे हे माहित नाही. मुख्यमंत्र्यांनी एकदा या भागाचा दौरा करावा म्हणजे दुष्काळ आहे की नाही हे त्यांना दिसेल असे खा. चव्हाण म्हणाले.
नरेंद्र मोदींच्या सरकारच्या काळात देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. राफेल घोटाळ्याची चौकशी करू नये म्हणूनच सीबीआय संचालकांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले. स्वायत्त संस्था मोडीत काढण्याचे प्रयत्न मोदींकडून सुरु आहेत. सीबीआयमधील सध्याच्या घडामोडी त्याचेच उदाहरण आहेत. देशातील लोकशाही आणि संविधान वाचवायचे असेल तर भाजपला सत्तेवरून खाली खेचावेच लागेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.