मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाऴी सुरु झाली असून जवळपास सर्वच महत्वाच्या पक्षांचे उमेदवार जाहीर झाले आहेत. यावर एबीपी माझा आणि नेल्सनने महाराष्ट्राचा मूड जाहीर केला असून विदर्भ, मराठवाड्यामध्ये युतीचेच सर्वाधिक खासदार निवडून येण्याची शक्यता वर्तविली आहे.
विदर्भात 10 जागांपैकी रामटेक ही 1 जागा काँग्रेसला मिळणार असल्याचे या सर्व्हेमध्ये म्हटले आहे. तसेच भाजपला 6, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादीला 0 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
तर मराठवाड्यातील 8 जागांपैकी पाच जागा युतीकडे जाणार असल्याचे म्हटले आहे. तर आघाडीला 3 जागा दाखविण्यात आल्या आहेत. यामध्ये भाजपला 3, शिवसेनेला 2, काँग्रेसला 2 आणि राष्ट्रवादीला 1 अशा जागा दाखविण्यात आल्या आहेत.
यावर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण, भाजपचे अतुल भातखळकर आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. यावेळी सत्ताधाऱ्यांनी विकास आणि कामगिरी दिसत असल्याचे म्हटले तर आघाडीच्या नेत्यांनी उमेदवार तुल्यबळ असल्याने मतदानावर परिणाम होऊन जागा बदलतील असे सुतोवाच केले आहे.
तर उत्तर महाराष्ट्रामध्ये 6 जागा आहेत. यापैकी 4 जागा भाजपाला, आणि प्रत्येकी 1 जागा शिवसेना आणि काँग्रेसला दाखविण्यात आली आहे. नंदूरबारची भाजपकडे असलेली जागा काँग्रेसला जाणार असल्याचे दाखविण्यात आले आहे. तर नाशिक शिवसेना, धुळे भाजपाकडेच राहणार असल्याचे या सर्व्हेमध्ये दाखविण्यात आले आहे.