यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विदर्भाच्या अमरावती विभागातील भाजपच्या तीन विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. त्यात लखन मलिक, डॉ. संदीप धुर्वे आणि हरीश पिंपळे यांचा समावेश आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी मतदारसंघात आमदार डॉ. संदीप धुर्वे यांचा पत्ता कापला जाण्याची दाट शक्यता आहे. माजी आमदार राजू तोडसाम या ठिकाणी भाजपचे उमेदवार असतील. तोडसाम यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. आधीही ते भाजपचे आमदार राहिले आहेत. तोडसाम यांच्या उमेदवारीला जिल्ह्यातील काही दोन बड्या नेत्यांनी विरोध केला होता. परंतु तरीही त्यांना संधी दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वाशिम मतदार संघात आमदार लखन मलिक यांचे तिकीट कापले जाईल, तिथे भाजपकडून श्याम खोडे यांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. मूर्तीजापूर मतदार संघात आमदार भाजपचे हरीश पिंपळे यांचेही तिकीट कापले जाणार हे जवळपास निश्चित आहे. तिथे गेल्यावेळी ४४ हजारांवर मते घेतलेले रवी राठी हे उमेदवार असतील. त्यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
यांना मिळेल संधी...
- अकोटमध्ये विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांनाच पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
- वरुड मोर्शीचे आमदार अजित पवार गटाचे देवेंद्र भुयार यांना महायुतीकडून उमेदवारी दिली जाणार नाही. ही जागा भाजपच्या वाट्याला गेली आहे. तिथे उमेश यावलकर हे भाजपचे उमेदवार असतील हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
- अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघात भाजपची उमेदवारी राजेश वानखेडे यांना मिळेल. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघात माजी आमदार चैनसुख संचेती यांचेच नाव आघाडीवर आहे.
- वाशिम जिल्ह्याच्या कारंजा मतदारसंघात ज्ञायक पाटणी की सईताई डहाके हा तिढा भाजपमध्ये कायम आहे. त्यावर शनिवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.