भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिकावे. लोकांच्या कनपट्टीवर बंदुका ठेवायच्या आणि आतमध्ये आणायचे. मग ती लोकं गाडीमध्ये झोपून जाणार..., अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवत जोरदार फटकेबाजी केली. ते पनवेल येथे आयोजित मनसेच्या निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांसोबत बोलत होते. राज म्हणाले, "त्या दिवशी आमचा अमित कुठे तरी जात होता, तो काही तरी टोल नाका फुटला, तेव्हा भाजपाने टीका केली, म्हणाले होते, रस्ते बांधायला पण शिका आणि टोल उभे करायलाही शिका. मला असे वाटते, भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिकावे. लोकांच्या कनपट्टीवर बंदुका ठेवायच्या आणि आतमध्ये आणायचे, मग ती लोकं गाडीमध्ये झोपून जाणार... मी तिथे होतो का गाडीमध्ये, निर्लज्ज पणाचा कळस आहे सर्व. सरकारमध्ये का आलात? म्हणे महाराष्ट्राचा विकास करायचाय. अरे कशाला खोटं बोलताय. पंतप्रधानांनी ७० हजार कोटींचा घोटाळा काढला त्यानंतर हे आलेत. एवढेच नाही, तर भुजबळांनी सांगितले असेल आतमध्ये काय काय असते," अशी टीका राज यांनी अजित पवारांवर केली.
तुम्हाला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी आलोय -भाषणाची सुरुवात करताना राज म्हणाले, "आज मी तुम्हाला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी आलोय, या आंदोलनासाठी. एखादे व्यंगचित्र काढावेसे वाटलेले. चंद्रयान जे चंद्रावर गेलेय त्याचा काय उपयोग आपल्याला. तिथे जाऊन खड्डेच पहायचेत ते महाराष्ट्रात सोडले असते तर खर्च वाचला असता."
"हा काही मुंबई गोवा महामार्गाचाच भाग नाहीय. नाशिकच्या रस्त्याचीही तिच अवस्था आहे. हे खड्डे काही आज नाही पडलेत. २००७ साली या रस्त्याचे काम सुरु झाले. काँग्रेसचे सरकार गेले शिवसेना भाजपाचे सरकार आले, त्यानंतर कोणा कोणाचे सरकार आले. या खड्ड्यांतून जात असताना, तुम्ही त्याच त्याच पक्षातील लोकांना कसे मतदान करता याचे आश्चर्य वाटतेय. म्हणजे आम्ही खड्ड्यातून गेलो काय आणि खड्ड्यात गोलो काय? तुम्हाला कधीच वाटत नाही का? या लोकांना एकदा धडा शिकवावा, यांना एकदा घरी बसवावं?" असा सवालही यावेळी राज यांनी यावेळी लोकांना केला.