BJP vs Uddhav Thackeray Sharad Pawar: बिहारची राजधानी पाटणा येथे १५ विरोधी पक्षांनी एकत्रित येत भाजपाविरोधात आघाडी उभारण्यासाठी मोठी सभा घेतली. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी या बैठकीत रणनीती ठरवण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशभरातील विरोधी पक्षांच्या भेटी घेतल्या. आज १५ विरोधी पक्षांचे मुख्य नेते पाटण्यात बैठकीसाठी दाखल झाले. या बैठकीला ११ वाजता सुरुवात झाली. या बैठकीत विरोधी पक्षांचा अजेंडा काय आहे, त्यात कोण सहभागी होणार, एकमत होणार की संघर्ष होणार, कोणाला काय मिळणार? यावर चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र भाजपाने या कार्यक्रमावर सडकून टीका केली आहे.
"एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत जाऊन देशाची मान उंचावत आहेत तर दुसरीकडे मोदीजींच्या विरोधात गळा काढण्यासाठी विरोधक आज पाटण्यात एकत्र येत आहेत. मोदीजींना देशहिताची चिंता आहे तर विरोधक स्वतःच हित जपण्यासाठी एकत्र आलेत. एकत्र आलेल्या विरोधकांना जनतेची नाही तर आपल्या मुलांची चिंता आहे. सोनिया गांधी राहुल गांधींना पंतप्रधान करु इच्छितात, शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांची चिंता आहे. उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंचं भविष्य दिसतंय. त्यामुळे आपल्या पोराबाळांच्या भविष्यासाठी विरोधक एकवटले आहेत. पण देशातील जनता या विरोधकांचा डाव ओळखून आहे. २०१९ सालीही जनतेनं मोदीजींवर विश्वास टाकत फक्त आपल्या कुटुंबाचं हित बघणाऱ्या विरोधकांना घरी बसवलं होतं आता २०२४ मध्येही जनता मोदीजींची साथ देणार आहे", असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
बैठकीआधी पवार काय म्हणाले?
बैठकीत देशासमोरच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. मणिपूरमधील सध्याची परिस्थिती यांसारख्या विषयावर चर्चा होणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करणं अशी कृत्ये देशात वाढली आहेत. विशेषतः ज्या राज्यांमध्ये भाजपाचं सरकार नाही तिथे हे सगळं घडत असल्याचं शरद पवारांनी सांगितले. तसेच अन्य राज्यातील नेते देखील त्यांचे स्थानिक प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती शरद पवारांनी यावेळी दिली.