BJP Criticized Sharad Pawar And Rahul Gandhi: अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर! वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. विठुरायाच्या नामगजरात निघणाऱ्या वारीला नामदिंडीचे स्वरूप प्राप्त होते. पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेल्या व्यक्तींचे तन, मन आणि धन सर्व काही देवाचरणी अर्पण होत असते. ही वारी घेऊन संतांच्या पालख्यांसह लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले. विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांचे मन तृप्त झाले. यातच वारीतील भगव्या पताक्याचा राहुल गांधी अन् शरद पवारांना इतका द्वेष का, अशी विचारणा भाजपाने केली आहे.
यंदाच्या वारीत शरद पवार सहभागी होणार असल्याचे सांगितले गेले होते. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी राहुल गांधी विठूरायाच्या दर्शनाला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, शरद पवार वारीत दिसले नाहीत तसेच राहुल गांधी पंढरपुरात गेले नाहीत, यावरून भाजपाने या दोन्ही नेत्यांवर टीका केली आहे. भाजपाने एक्सवर एक पोस्ट केली आहे. शेवटी ते वारीला आलेच नाहीत, असे सांगत भाजपाने शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
शेवटी ते वारीला आलेच नाहीत...
शेवटी ते वारीला आलेच नाहीत. वारीतील भगव्या पताक्याचा राहुल गांधी आणि शरद पवारांना इतका द्वेष का? शरद पवार आणि राहुल गांधी यांचे जे काही थोडे खासदार अपप्रचारमुळे निवडून आले आणि विशेष व्होट बँक नाराज होईल या भीतीने दोघांनी वारीत येण्याचे टाळले. यापूर्वी विठूरायाची मूर्ती नाकारलेल्या राहुल गांधी यांनी वारीचे आमंत्रण स्वीकारून वारीत सहभागी घेतला नाही. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा वारकऱ्यांचा, परंपरेचा अपमान केला. हिंदू धर्म ज्यांचा चेष्टेचा विषय असतो अशा शरद पवारांना यंदा वारी आठवली, मात्र आपल्या सवयीप्रमाणे त्यांनी शेवटी काढता पाय घेतला. शेवटी आमचे तुकोबाराय म्हणालेच आहेत येऱ्यागबाळ्याचे काम नोहे, असा खोचक टोला भाजपाने लगावला आहे.
दरम्यान, वारीतली भगवी पताका खांद्यावर घेण्यासाठी पाठीशी पुण्याई आणि विठूरायाबद्दलची आस्था हवी, तुम्ही माध्यमांना हाताशी धरून वारीत सहभाग घेण्याच्या वावड्या उठवल्या खऱ्या मात्र तुमची पुण्याई कमी पडली. गेली अनेक शतके वारीची ही परंपरा चालत आली आहे. लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी तितक्याच तन्मयतेने दरवर्षी येत असतात. हिंदूद्वेषी आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना वारीतला रामकृष्ण हरीचा जयघोष रुचलाच नसता, असा हल्लाबोल भाजपाने केला.