ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 04 : गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढल्यानेच चौथ्या क्रमांकावर राहणारा भाजप नंबर वन झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात गेल्या पावनेदोन वर्षाच्या कार्यकाळात उपराजधानीचा चौफेर विकास होत असल्याने महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती न करता एकला चलोरे चा नारा भाजपच्या नागपूर महानगर कार्यसमितीच्या बैठकीत देण्यात आला. महापालिकेच्या निवडणुकीला सहा-सात महिन्यांचाच कालावधी शिल्लक असल्याने भाजपने निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून कार्यसमितीची बैठक आयोजित करण्यात आली. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आले. याच धर्तीवर महापालिका निवडणूक स्वबळावर लढल्यास एकहाती सत्ता येईल, असा सूर पदाधिकारी व आमदारांचा होता.भाजपचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून सत्तेत सहभागी असूनही शिवसेना टीका करून सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहे. एवढेच नव्हेतर शिवसेना कार्यकर्त्यांची मजल भाजप नेत्यांचे पुतळे जाळण्यापर्यंत गेली आहे. याला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा आमदार कृष्णा खोपडे यांनी दिला. आमदार सुधाकर देशमुख यांनी स्वबळावर निवडणुका लढवून महापालिकेत तिसऱ्यांदा कमळ फुलविण्याचा संकल्प जाहीर केला.गेल्या निवडणुकीतही महापालिकेत भाजपने शिवसेनेला बाजूला सारून अपक्ष व छोट्या पक्षाच्या नगरसेवकांना सोबत घेऊ न सत्ता आणली. आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे महापालिक ेतील १५१ पैकी १२० जागा निवडून आणण्याची तयारी भाजप नेत्यांनी सुरू केली आहे. ३० आॅगस्टपर्यंत मतदार नोंदणीचा धडक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय कार्यसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.
भाजपचा नारा 'एकला चलोरे'!
By admin | Published: July 04, 2016 7:30 PM