मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आज 50 दिवस झाले आहेत. तर याच मुद्यावरून भाजपने ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने सोशल मिडियावरून ठाकरे सरकार आणि फडणवीस सरकारने केलेल्या सुरवातीच्या 50 दिवसांच्या कामांचा आलेख दाखवत, 50 दिवस महा‘भकास’आघाडीचे अशा शब्दात टीका केली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाने महाविकास आघाडीच्या सरकारवर 'बिनकामाची पन्नाशी' अशा शब्दांत घणाघाती टीका केली आहे. यावेळी माजी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची सरकार स्थापन झाल्यावर सुरवातीच्या 50 दिवसात घेतलेले निर्णय आणि केलेल्या कामांचा उल्लेख केला गेला आहे.
तर दुसऱ्या बाजूला मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या 50 दिवसात शासकीय योजनांना दिलेल्या स्थगितीचा उल्लेख करण्यात आला आहे. तर आत्ताच सरकार म्हणजे फक्त स्थगिती सरकार असल्याची टीका करण्यात आली आहे.
ठाकरे सरकारच्या नेत्यांचे 50 दिवस हे फक्त मंत्रिमंडळ विस्तार, खाते,बंगले,दालन यासाठी घेतलेल्या बैठकीतच गेल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर नगरविकास खात्याचे कामे, ग्रामविकास खात्याचे कामे, जलयुक्त शिवार आणि इतर कामांना स्थगिती देऊन, हे सरकार गेल्या 50 दिवसात फक्त स्थगिती सरकार ठरला असल्याचा सुद्धा आरोप भाजपने केला आहे.