शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी युतीवरून भाजपवर जोरदार टीका केली. तसंच आपण २५ वर्षे युतीत सडलो या आपल्या वक्तव्याचा पुनरूच्चार केला. परंतु उद्धव ठाकरे यांच्या टीकांवर भाजपनं पलटवार केला आहे. भाजपचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"तिच भाषा तिच वाक्ये. ७ वर्षे उलटली. दिल्ली तर दूरच, महाराष्ट्रातही पक्ष चौथ्या क्रमांकावर गेला. शिवबंधनाचे किती धागे तुटले, किती तलवारी म्यान झाल्या, किती निष्ठावंत दुरावले हेही पाहा," असं म्हणत उपाध्ये यांनी शिवसेना पक्षप्रमुखांवर निशाणा साधला. "माझा चेहरा भाजपने वापरल्यामुळे भाजपला मते मिळाली, १०५ जागांवर भाजपला विजय मिळाला, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. अहो पण तोच चेहरा असताना शिवसेनेने साधा ६०चा आकडाही गाठला नाही, ना आता चौथा क्रमांक पार करता आला नाही," असं म्हणत त्यांनी टोला लगावला.